नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जगात अव्वलस्थानी पोहोचण्याचे भारताचे ध्येय असून 2027 पर्यंत अॅटोमोबाईलमध्ये चीनलाही मागे टाकू, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
महामार्गाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर बोलताना गडकरी म्हणाले की, येत्या तीन ते चार वर्षांत अॅटोमोबाईल उत्पादनात भारत जगात अग्रस्थानी असेल. चीनलाही या क्षेत्रात आपण मागे टाकलेले असेल. केंद्र सरकारने अॅटोमोबाईल निर्मितीसंदर्भात एक विशिष्ट ध्येय निश्चित केले आहे. त्यानुसार सरकारची वाटचाल आणि नियोजन सुरू आहे. नऊ वर्षांपूर्वी अॅटोमोबाईल क्षेत्रामधील उलाढाल 4.5 लाख कोटी होती. सध्या ही उलाढाल 12.5 लाख कोटींवर पोहोचली आहे.
गेल्यावर्षी आपण जपानला मागे टाकले असून अॅटोमोबाईल उत्पादनात सध्या आपण जगात तिसर्या क्रमांकावर आहोत. सध्या या क्षेत्रात अमेरिकेचा एक नंबर असून चीन दुसर्या क्रमांकावर आहे. अभियंते, कमी खर्चातील मनुष्यबळ आणि सरकारची अनुकूल धोरणे यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीस भारतात मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
'टेस्ला' गुंतवणूक करणार
'टेस्ला'चे मालक इलॉन मस्क भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत. अॅटोमोबाईल क्षेत्रात भारतात संधी असल्यामुळेच विदेशातील कंपन्या गुंतवणुकीसाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, चीनच्या बीवायडी कंपनीचा 100 कोटींचा प्रकल्प केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे.