नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश-विदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंची विक्री ई-लिलावाद्वारे गांधी जयंतीनिमित्त आजपासून सुरू झाली आहे. सर्वसामान्यांना 100 रुपयांपासून ते 64 लाख रुपयांपर्यंत या भेटवस्तू ई-लिलावातून खरेदी करता येणार आहेत. हा ई-लिलाव 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंची सांस्कृतिक मंत्रालयातर्फे लिलावाद्वारे विक्री करण्याची ही पाचवी आवृत्ती आहे. सांस्कृतिक खात्याच्या मंत्री मीनाक्षी लेखी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना देश-विदेशातील दौर्यांमध्ये मिळालेली 912 स्मृतिचिन्हे आणि भेटवस्तू या लिलावात ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या विक्रीतून मिळणारा निधी नमामी गंगे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी वापरण्यात येईल. या भेटवस्तूंचा तपशील https://pmmementos.gov.in/ या संकेतस्थळावर असून, याच संकेतस्थळावरून ई-लिलावामध्ये भाग घेता येईल.
मंत्री मीनाक्षी लेखी यांनी सांगितले की, या ई-लिलावामध्ये आमचा समृद्ध वारसा दाखवणार्या कलाकृतींचा संग्रह ठेवण्यात आला आहे. यातील विविध स्मृतिचिन्हांमध्ये आणि भेटवस्तूंमध्ये चित्रे, नक्षीदार शिल्पे, स्वदेशी हस्तकला आणि आकर्षक कलाकृती, पारंपरिक आदिवासी कलाकृतींचा समावेश आहे.