

अमृतसर, वृत्तसंस्था : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर माथा टेकला. यानंतर त्यांनी सचखंडमधील श्री हरमंदिर साहिबमध्ये जाऊन सेवाकार्य करत लंगरहॉलमध्ये भांडी धुतली. काँग्रेस आणि आम आदमी पक्षात तणावाची स्थिती असताना राहुल गांधी यांचा पंजाब दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. याबाबतची माहिती पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग यांनी एक्सवरून (ट्विटर) दिली.
राहुल गांधी यांचा हा खासगी आणि आध्यात्मिक दौरा आहे. त्यामुळे त्यांच्या दौर्याचा सन्मान करा. कोणत्याही कार्यकर्त्यांनी मंदिरात उपस्थित राहू नये, पण राहुल गांधी यांच्या दौर्याला अप्रत्यक्ष उत्साहाने पाठिंबा देऊ शकता. पुढील दौर्यात त्यांना तुम्ही भेटू शकता! सतनाम श्री वाहेगुरू..! असे अमरिंदर सिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पंजाब काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंग खैरा यांच्या अटकेनंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा पंजाब दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ड्रग्जप्रकरणी झालेल्या सुखपाल सिंग यांच्या अटकेमुळे पंजाबमधील काँग्रेस नेते इंडिया आघाडीतील आम आदमी पक्षाच्या सहभागाला विरोध करताना दिसत आहेत.