Manipur Violence : मणिपुरातील हिंसाचारात आता खलिस्तानी कनेक्शन | पुढारी

Manipur Violence : मणिपुरातील हिंसाचारात आता खलिस्तानी कनेक्शन

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मणिपूरमध्ये हिंसाचार शमत आलेला असताना तो पूर्ववत बनलेला आहे. नव्याने सुरू झालेल्या या हिंसाचारामागेही खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे समोर आले आहे. कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर कुकी समुदायातील एका फुटीरवादी नेत्याने दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूसोबत बैठक घेतल्याचे पुरावे गुप्तचर यंत्रणांकडे उपलब्ध झाले आहेत. पन्नू व कुकी नेत्यात 3 तास चाललेल्या या बैठकीनंतर खलिस्तानी नेटवर्कच्या माध्यमातून हवालाद्वारे कोट्यवधी रुपये मणिपूरला पाठवण्यात आले.

कॅनडातील ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील गुरुद्वार्‍यामध्ये खलिस्तानी समर्थकांची बैठक झाली होती. या बैठकीचा व्हिडीओ भारतीय यंत्रणांकडे उपलब्ध असून, त्यात कुकी फुटीरतावादी नेता लीन गंगटेही आहे. गंगटे हा नॉर्थ अमेरिकन मणिपूर ट्रायबल असोसिएशनचा प्रमुख आहे. गंगटे उपस्थित खलिस्तान्यांसमोर आपले भारतविरोधी मत मांडताना दिसत आहे. तुम्ही लोक खलिस्तानची मागणी करत आहात, तसेच आम्हीही वेगळ्या मणिपूरसाठी लढत आहोत. सरकारला मणिपूरमधील कुकी नेत्यांचा सर्वनाश करायचा आहे. या कुकी नेत्यांनाही कॅनडात राजकीय आश्रयासाठी आपण (खलिस्तान्यांनी) मदत करावी, असे आवाहनही या भाषणातून गंगटे करतो आहे.

देशाविरुद्ध युद्ध; मणिपुरात पहिली अटक

एनआयएने मणिपूरमध्ये देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपाखाली पहिली अटक केली आहे. एनआयएने चुरचंदपूर येथून इमिनलून गंगटे याला ताब्यात घेतले आहे. गंगटे याच्यावर दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.

Back to top button