केरळ हायकोर्टानेच ठेवले मुलीचे नाव; तीन वर्षांपासून दाम्‍पत्‍यामध्ये वाद, अखेर निघाला तोडगा | पुढारी

केरळ हायकोर्टानेच ठेवले मुलीचे नाव; तीन वर्षांपासून दाम्‍पत्‍यामध्ये वाद, अखेर निघाला तोडगा

कोची, वृत्तसंस्था : माता-पित्यामध्ये बर्‍याच काळापासून सुरू असलेल्या वादानंतर त्यांच्या मुलीचे नाव केरळ हायकोर्टानेच ठेवले असल्याची विचित्र माहिती समोर आली आहे. नावावरून दाम्पत्यामध्ये वाद सुरू होता आणि याचदरम्यान हे प्रकरण हायकोर्टात पोहोचले. गेल्या तीन वर्षांपासून त्या मुलीचे नाव ठेवण्यात आले नव्हते हे विशेष! अखेर दाम्पत्यातील वाद मिटवण्यासाठी कोर्टाने मुलीचे नाव ‘पुण्य’ असे ठेवले. तसेच नायर नावासोबत वडिलांचे बालगंगाधरनही जोडले जावे, असा निकाल न्यायालयाने दिला.

प्रकरणाच्या सुनावणीत सर्व बाबींचा विचार करून कोर्टाने सांगितले की, मूल आईसोबत राहात असेल तर तिने दिलेल्या नावाला महत्त्व द्यावेच लागेल तसेच समाज पितृसत्ताक असल्याने मुलाच्या नावासोबत वडिलांच्या नावाचाही समावेश करावा लागेल. बाळाचे नाव ठेवण्यास उशीर झाल्याने त्याच्या भविष्यावर परिणाम होत असून, सामाजिक आणि सांस्कृतिकद़ृष्ट्या ती मागे पडली होती.

पालकांच्या भांडणापेक्षा मुलीचे कल्याण महत्त्वाचे असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला. आई मुलीला शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेली असता मुलीच्या नावाचा प्रश्न निर्माण झाला. शाळा प्रशासनाने मुलीचे जन्म प्रमाणपत्र तिच्याकडे मागितले. तिच्या जन्म दाखल्यावरही नाव नव्हते. शाळेने नावाशिवाय जन्म प्रमाणपत्र स्वीकारण्यास नकार दिला. वडिलांना मुलीचे नाव पद्मा नायर असे ठेवायचे होते. यावर दाम्पत्यामध्ये एकमत नसल्याने ते विभक्त झाले होते.

Back to top button