चिनी फौजांना न दिसणार्‍या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण | पुढारी

चिनी फौजांना न दिसणार्‍या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पूर्व लडाखमधील चीनच्या सैन्यासमोर उभ्या असणार्‍या भारतीय फौजांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा रस्ता जवळपास पूर्ण झाला आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवरून चीनच्या फौजांना हा रस्ता दिसू न शकणार्‍या भागातून जात असल्याने सीमेवर तैनात भारतीय लष्कराला दारूगोळा, रसद आणि अतिरिक्त सैन्यदल पोहोचवणे शक्य होणार आहे.

लडाखच्या सीमेवर चिनी सैन्य तैनात आहे. या सैन्याचा मुकाबला करण्यासाठी प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारतीय सैन्यही मोठ्या प्रमाणात तैनात असते. सीमेवर संघर्षाच्या स्थितीत भारतीय सैन्याला तातडीची रसद, अतिरिक्त फौज पुरवताना आतापर्यंत हवाई मार्गाचाच वापर करावा लागायचा. कारण ताबा रेषेवर चीनची ठाणी उंचावर आहेत. अशा स्थितीत चीनच्या सैन्याला दिसणार नाही अशा भागातून रस्ता तयार करण्याची कामगिरी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने केली आहे.

नुब्रा व्हॅलीतील सासोमा ते काराकोरम खिंडीजवळचा भारताचा दौलत बेग ओल्डी हा तळ असा 130 कि.मी.चा रस्ता आहे. बीआरओच्या 2000 जणांच्या टीमने या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण करीत आणले असून नोव्हेंबर महिन्यात तो पूर्ण होईल. श्योक नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यावर या रस्त्याच्या मार्गाने थेट दौलत बेग ओल्डी तळावर अतिरिक्त सैन्य कुमक, रसद आणि दारूगोळा जलदगतीने पाठवणे शक्य होणार आहे.

यामुळे सासेरला येथून चिनी सैन्याच्या नजरेला न पडता भारताला जलद हालचाली करणे शक्य होणार आहे, अशी माहिती लष्करी अधिकार्‍यांनी दिली. सासेरला या भागात हिमनदी असल्याने ते बांधकाम अवघड होते. पण ते शिवधनुष्यही बीआरओच्या पथकाने पेलून दाखवले आहे.

Back to top button