

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या 14 मिनिटांत रेल्वेची स्वच्छता करण्याची नवी आगळीवेगळी मोहीम गांधी जयंतीच्या एक दिवसआधी म्हणजे रविवारपासून (1 ऑक्टोबर) सुरू होणार आहे. 14 मिनिटांचा चमत्कार (फोर्टीन मिनिट मिरॅकल) असे या स्वच्छता मोहिमेचे नाव असून, सुरुवातीला 'वंदे भारत' रेल्वेगाड्यांपासून या स्वच्छतेस प्रारंभ होत आहे. मुंबई, नागपूर आणि शिर्डीसह देशभरातील 29 रेल्वेस्थानकांवर आजपासून 14 मिनिटांत 'वंदे भारत' गाड्यांची स्वच्छता करण्यात येईल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. जपानमध्ये सात मिनिटांत रेल्वेगाड्यांची स्वच्छता केली जाते. त्या धर्तीवर भारतात 14 मिनिटांचा चमत्कार ही स्वच्छता मोहीम आजपासून सुरू केली जाणार आहे. ही मोहीम देशभरात एकाचवेळी राबविली जाईल. यांतर्गत 'वंदे भारत' रेल्वेगाडीची स्वच्छता 14 मिनिटांत पूर्ण करण्यात येईल. रेल्वमंत्र्यांनी सांगितले की, एका डब्यात चार कर्मचारी याप्रमाणे आठ डब्यांच्या गाडीमध्ये 32 कर्मचारी अत्याधुनिक यंत्रांद्वारे स्वच्छता करतील. सुरुवातीला 'वंदे भारत' रेल्वेगाड्यांमध्ये स्वच्छता केली जाणार असून, कालांतराने सर्व प्रवासी रेल्वेगाड्यांमध्ये याच धर्तीची सेवा सुरू करण्यात येईल, अशीही पुस्ती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी जोडली. सद्यस्थितीत गंतव्य स्थानावर पोहोचणार्या रेल्वेगाडीच्या स्वच्छतेसाठी तीन ते चार तास लागतात. काही मिनिटांत होणार्या स्वच्छतेमुळे रेल्वेची प्रवासी सेवा अधिक गतिमान होईल, असा दावाही रेल्वेमंत्र्यांनी केला.
मुंबई : जपानमधील बुलेट ट्रेनच्या क्लीनिंग मिरॅकल धर्तीवर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने अवघ्या सात मिनिटांत एलटीटी-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस स्वच्छ करून चकाचक केली. एकूण 20 डब्यांची एक्स्प्रेस सकाळी 11.18 वाजता एलटीटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तब्बल 110 सफाई कर्मचारी, 11 सुरक्षा कर्मचारी, 6 वाणिज्यिक कर्मचारी आणि 2 बांधकाम कार्य निरीक्षकांच्या मदतीने सकाळी 11 वाजून 38 मिनिटांच्या सुमारास एक्स्प्रेस पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली.