पुढारी ऑनलाईन डेस्क : गृहिणी (Housewife ) केवळ घरातील काम करत नाही तर ती संपूर्ण कुटुंबाची काळजी देखलील घेते. एक सामान्य माणसाची कमाईशी गृहिणीच्या कमाईची तुलना करता येत नाही. तिचे उत्पन्न मासिक वेतन रूपात मोजता येत नाही असे निरीक्षण कोलकाता उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच २०१३ मध्ये अपघातात गंभीर दुखापत झालेल्या गृहिणीला मिळणार्या नुकसान भरपाईत वाढ करण्याचे निर्देशही दिले.
ऑक्टोबर २०१३ मध्ये गृहिणी(Housewife) असणार्या महिलेला मोटार व्हॅनने धडक दिली होती. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला ५० टक्के अपंगत्व आले. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने विमा कंपनीला दोन लाख ९ हजार ७४६रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले होते. याविरोधात महिलेने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर एकल खंडपीठाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अजय कुमार गुप्ता यांच्यासमोर सुनावणी झाली.
याचिकेत म्हटले होते की, अपघातानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुक्तपणे फिरू शकत नाही. चालण्याच्या क्षमतेवरही मर्यादा आल्या आहेत. भविष्यातील कमाईची क्षमताही गमावली आहे. तसेच अपघातानंतरच्या मानसिक वेदना आणि यातना देखील सहन कराव्या लागल्या. त्यामुळे मिळालेले नुकसान भरपाई अल्प आहे.
न्यायमूर्ती अजय कुमार गुप्ता यांनी स्पष्ट केले की, कागदपत्र किंवा पगाराचे प्रमाणपत्र देऊन गृहिणीने तिचे वास्तविक उत्पन्न सिद्ध करणे अपेक्षितच नाही. कारण गृहिणीच्या नोकरीसाठी सामान्य नोकरी किंवा कमावत्या व्यक्तीच्या सेवेपेक्षा जास्त योगदान आवश्यक आहे. ती दिवसभर तिचा पती, मुले, पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांची देखभाल करत असते. त्यांची काळजी घेणे, साफसफाई करणे, जेवण करणे आणि इतर अनेक मार्गांनी परिणामी तिचे उत्पन्न सामान्य व्यक्तीच्या कमाईशी बरोबरी करता येत नाही. तिचे उत्पन्न मासिक पगार किंवा वेतनाच्या रूपात मोजले जाऊ शकत नाही," असे खंडपीठाने सांगितले.
अपीलकर्त्या गृहिणी असल्याने तिच्या वेदना, यातना आणि त्रास सहन करावा लागला, याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम वाढवणे आवश्यक आहे. अपघातानंतर तिच्यावर अनेक रुग्णालयांमध्ये उपचार झाले याचाही विचार केला पाहिजे, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती अजय कुमार गुप्ता यांनी २ लाख १४ हजार रुपयांची अतिरिक्त भरपाई रक्कम देण्याचे आदेश दिले.
हेही वाचा :