Ujjain Case : उज्जैनमध्‍ये अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार, नराधमास अटक; ३ ताब्यात | पुढारी

Ujjain Case : उज्जैनमध्‍ये अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार, नराधमास अटक; ३ ताब्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्‍ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक  घटना  समोर आली.  रक्तस्राव झालेल्या मुलीचा रस्त्यावरून चालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.  नराधमांनी पीडित मुलीवर अत्याचार करून तिला रस्त्यावर फेकले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका ऑटो चालकाला अटक करण्‍यात आली आहे. अन्य तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ऑटोवर रक्ताचे डाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Ujjain Case) राकेश (३८) असे अटक केलेल्या ऑटोचालकाचे नाव आहे.

Ujjain Case : काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेश राज्यातील उज्जैनमध्‍ये नराधमांनी पीडित मुलीवर बलात्कार करून तिला रस्त्यावर फेकले. यानंतर ही अल्पवयीन मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेतच अनेकांकडे मदत मागत आहे; परंतु तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पीडित मुलीला उपचारासाठी इंदूर येथे दाखल करण्‍यात आले आहे. या प्रकरणाच्‍या चाैकशीसाठी  उज्जैन एसपींनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केली आहे.

ऑटोवर रक्ताचे डाग

या प्रकरणी पोलिसांनी  ऑटो चालकाला अटक केली आहे. राकेश (३८) असे त्‍याचे नाव आहे. तसेच  तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की,  आठ किमीच्या अंतरावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे. जिथे पीडित मुलगी मदतीची याचना करताना पायी चालत होती. या घटनेवर भाष्य करताना, पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी एका ऑटोमध्ये बसली होती. याचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील प्राप्त करण्यात आला आहे. त्यानंतर ऑटोवर रक्ताचे डागही आढळून आले असून ऑटोची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. या  या प्रकरणात ताब्यात घेतलेल्यांची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक

एका पाेलीस अधिकाऱ्याने ‘पीटीआय’शी बोलताना  सांगितले की,  पीडित मुलीवर बुधवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया केली आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी महाकाल पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.  गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्‍हटले आहे की, या प्रकरणाच्‍या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button