पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.२५ सप्टेंबर) नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील ५१ हजार पदांसाठी नियुक्त ५१ हजार जणांना आजच्या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रे देण्यात आली. पीएम मोदींच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.
'रोजगार मेळाव्यात आज नियुक्तीपत्रे मिळालेल्या सर्व नव्याने नियुक्ती झालेल्यांचे पीएम मोदींनी अभिनंदन केले. नवीन नियुक्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक आता दोन्ही सभागृहांनी विक्रमी मतांनी मंजूर केले आहे. देशाच्या नव्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. यामुळे एक प्रकारे, संसदेच्या नव्या इमारतीपासून देशाच्या नव्या भविष्याची सुरुवात होत आहे. तसेच महिलांसाठी नवीन दरवाजे उघडण्याचे सरकारचे धोरण आहे. आपला देश ऐतिहासिक कामगिरी आणि निर्णयांचा साक्षीदार आहे. काही दिवसांपूर्वी, देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला 'नारी शक्ती वंदन अधिनियम'च्या (महिला आरक्षण विधेयक) रूपाने मोठी ताकद मिळाली असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
२१ व्या शतकातील भारताच्या आकांक्षा खूप उंच आहेत. नवीन भारत काय चमत्कार करत आहे ते तुम्ही पाहत आहात. चंद्रावर तिरंगा फडकवणार्या नवीन भारताची स्वप्ने खूप उंच आहेत. सरकारी योजनांमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराने भ्रष्टाचार, गुंतागुंत रोखली गेली. तसेच यामुळे सरकारी योजनांमध्ये विश्वासार्हता आणि आराम वाढला असल्याचे पीएम मोदी म्हणाले.विविध सरकारी विभागांमध्ये सुमारे 51,000 नवीन नियुक्त कर्मचार्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण केल्यानंतर पीएम मोदी म्हणाले.
देशाने 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याचा संकल्प केला आहे. येत्या काही वर्षांत आम्ही तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. या काळात प्रत्येक सरकारी कर्मचारी खूप मोठी भूमिका बजावणार आहे. तुम्हाला नेहमीच नागरिक प्रथम भावनेने काम करावे लागेल. तुम्ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाढलेल्या पिढीचा एक भाग आहात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे, असे देखील पीएम मोदी रोजगार मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले.