Operation K : भारताचे आता ‘ऑपरेशन के’ | पुढारी

Operation K : भारताचे आता 'ऑपरेशन के'

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : खलिस्तानी दहशतवादी आणि खलिस्तान समर्थक गँगस्टरचे साटेलोटे संपविण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांच्या सहकार्याने निर्णायक कारवाईची तयारी चालविली आहे. यांतर्गत पुढील महिन्यात ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्लीमध्ये ‘एनआयए’, ‘आयबी’, ‘रॉ’ तसेच राज्यांच्या ‘एटीएस’ची महत्त्वाची एकत्रित बैठक होणार आहे.

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येसंदर्भात कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांनंतर दोन्ही देशांमधील तणाव टोकाला पोहोचला आहे. या घटनाक्रमानंतर खलिस्तानी दहशतवादानेही उचल खाल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंजाबसह अन्य भागांमधून खलिस्तानी दहशतवादाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी निर्णायक कारवाईची तयारी सुरू केली आहे. यांतर्गत दहशतवादी संघटनांवर ठोस कारवाई, त्यांचे आर्थिक पाठबळ तोडणे, यासाठी ‘एनआयए’ने बोलावलेली बैठक महत्त्वाची असेल. या बैठकीला सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. खलिस्तानी दहशतवादाचे कंबरडे मोडणे, हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असून, पंजाबसह राजस्थान, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली क्षेत्रातील खलिस्तानी फुटीरवाद्यांविरुद्ध आक्रमक मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी ‘एनआयए’, ‘आयबी’ आणि राज्यांची दहशतवादविरोधी पथके एकत्रितपणे दहशतवादी कारवाईच्या तपशिलांचे परस्परांसमवेत आदानप्रदान करतील आणि त्यानुसार कारवाई केली जाईल.

भारताचे तुकडे करण्याचा होता पन्नूचा कट

भारताचे धर्माच्या आधारावर तुकडे करून काश्मीर, खलिस्तान, उर्दुस्तान असे वेगवेगळे देश तयार करण्याचा कट गुरपतवतसिंग पन्नूने आखल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. काश्मिरीसाठी काश्मीर, शिखासाठी खलिस्तान आणि मुस्लिमांसाठी उर्दुस्तान अशी योजनाही बनवली.

‘ओसीआय’ कार्ड रद्द करणार

भारताबाहेर राहणाऱ्या खलिस्तानी दहशतवाद्यांचे प्रवासी भारतीय कार्ड अर्थात ‘ओसीआय’ कार्ड रद्द करण्यात येणार आहे. यामुळे अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील खलिस्तान्यांना भारतात येता येणार नाही.

Back to top button