

भोपाळ, वृत्तसंस्था : सत्तेत आल्यास काँग्रेस मध्य प्रदेशला मागास राज्यांचा दर्जा असणार्या बिमारू राज्यांच्या यादीत घेऊन जाईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
भारतीय जनता पार्टीने जनसंघाचे दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशमध्ये कार्यकर्ता महाकुंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मोदी म्हणाले, मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा हे बिमारू (आजारी) राज्य होते. घाणेरडे राजकारण, कुशासन आणि कोट्यवधींचा भ्रष्टाचार ही काँग्रेस सरकारची ओळख होती. परंतु, आता मध्य प्रदेशने झेप घेतली आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर मध्य प्रदेशात दीर्घ काळ काँग्रेसचीच सत्ता होती.
परंतु, या काळात काँग्रेसने नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध अशा मध्य प्रदेश राज्याला आजारी राज्य बनवले. काँग्रेसच्या काळात मध्य प्रदेशात घोटाळ्यांचे विक्रम झाले, घोटाळ्यांचे इतिहास रचले गेले. व्होट बँक, तुष्टीकरणाचे राजकारण करणार्या या पक्षाला पुन्हा मध्य प्रदेशात संधी मिळाली तर राज्याचं आणखी नुकसान होईल. काँग्रेस पुन्हा एकदा मध्य प्रदेश राज्याला आजारी राज्य बनवेल. काँग्रेसला देशाला 20 व्या शतकात न्यायचे आहे. देशाची प्रगती त्यांना खुपत आहे, अशी टीका त्यांनी केली.
राजस्थानात काँग्रेसकडून आऊटसोर्सिंग
जयपूर येथील सभेतही मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. शहरी नक्षलवाद्यांना पाठीशी घालणार्या काँग्रेसला मतदार धडा शिकवतील. राजस्थानात काँग्रेस नेते सरकार चालवत नसून आऊटसोर्सिंगद्वारे सरकार चालविले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवास सामोरे जावे लागणार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.