नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ज्या हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडातील संबंध ताणले गेले आहेत, त्या निज्जरच्या घातपाती कारवायांतील सहभागाचे सज्जड पुरावे भारतीय गुप्तचरांच्या हाती आहेत. निज्जरने भारतात अनेक घातपाती कारवायांचा कट आखला होता, असे आता समोर आले आहे.
भारतात असताना किरकोळ गुंडगिरी करताना बनावट पासपोर्टच्या आधारे निज्जर 1996 मध्ये कॅनडाला गेला. तेथे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. यानंतर त्याने पाकिस्तानात जाऊन शस्त्रे व स्फोटकांचे प्रशिक्षण घेतले. कॅनडात बसून त्याने पंजाबमध्ये अनेक हत्या व हल्ल्यांचे कट आखले व ते तडीस नेले.
भारतीय गुप्तचर खात्याने त्याची सारी चोपडीच तयार केली असून त्यातील माहिती धक्कादायक आहे. त्यात म्हटले आहे की, जालंधरच्या भारसिंग पुरा येथील निज्जर गुरनेक सिंग नेका या गँगस्टरच्या संपर्कात आला. 1980 ते 90 या दशकात तो खलिस्तान कमांडो फोर्सच्या दहशवाद्यांच्या संपर्कात आला. 2012 पासून तो जगतार सिंग ताराच्या खलिस्तान टायगर फोर्समध्ये सहभागी झाला. विविध दहशतवादी घटनांत त्याचे नाव येताच तो 1996 मध्ये कॅनडाला पळाला. तेथूनही तो जगतार सिंग ताराच्या संपर्कात राहिला. 2012 मध्ये बैसाखी जथ्थ सदस्य म्हणून तो पाकिस्तानात गेला व तेथे पंधरा दिवसांचे शस्त्र व बॉम्ब प्रशिक्षण घेतले. त्यानंतर कॅनडात परतल्यावर त्याने दहशतवादी संघटनांसाठी निधी गोळा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याचे साथीदार ड्रग्ज आणि शस्त्रांच्या स्मगलिंगमध्येही उतरले.
2015 मध्ये निज्जरने जगतार सिंग ताराच्या मदतीने पंजाबमध्ये घातपात घडवण्यासाठी टोळीही तयार केली होती. त्यांना कॅनडात स्फोटके व शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षणही दिले होते. 2014 मध्ये हरियाणातील सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयावर हल्ल्याचा कट आखला होता. पण त्याला भारतात येता न आल्याने त्याने भारतातील आपल्या मोड्यूलला माजी महासंचालक महंमद इजहार आलम, पंजाबमधील शिवसेना नेते निशंत शर्मा आणि बाबा मानसिंग पेहोआवाले यांच्या हत्येचे आदेश सोडले. मनोहरलाल अरोरा व जतिंदरबीर सिंग अरोरा या दोघांच्या हत्येसाठी निज्जरने 2020 मध्ये अर्शदीप यास सुपारी दिली. मनोहरलाल अरोरा मारले गेले व त्यांचा मुलगा जखमी झाला. याशिवाय 2021 मध्ये निज्जरने आपल्याच गावातील एका ग्रंथीचीही सुपारी अर्शदीपला दिली. त्या हल्ल्यात ग्रंथी गंभीर जखमी झाले. निज्जर याने कॅनडात बसून पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांसाठी यंत्रणा तयार केली होती, असे गुप्तचरांच्या अहवालात म्हटले आहे.