अंतराळवीर सुरक्षितता चाचणी ऑक्टोबरमध्ये | पुढारी

अंतराळवीर सुरक्षितता चाचणी ऑक्टोबरमध्ये

बंगळूर, वृत्तसंस्था : इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे नियोजित भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेअंतर्गत गगनयानच्या ‘क्रू एस्केप सिस्टीम’ची चाचणी लवकरच पार पडणार आहे. मोहिमेदरम्यान रॉकेटमध्ये बिघाडासह अन्य कोणतीही समस्या उद्भवल्यास उपस्थित अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षितपणे कसे पोहोचतील, ते या चाचणीने तपासले जाणार आहे.

इस्रोचे शास्त्रज्ञ तसेच इनिर्शिअल सिस्टीम्स युनिटचे संचालक पद्म कुमार ई. एस. यांनी ही माहिती दिली. चाचणी पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये घेतली जाईल. बिघाडाच्या परिस्थितीत यानातील सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी इस्रोने खास क्रू एस्केप सिस्टीम तयार केली आहे. ही यंत्रणा ‘क्रू’ला रॉकेटपासून दूर नेईल. या यंत्रणेच्या चाचणीसाठी चाचणी वाहनही तयार करण्यात आले आहे, असे पद्म कुमार यांनी सांगितले.

गगनयान मिशनची पहिली मानवरहित मोहीम पुढील वर्षाच्या सुरुवातीस आखण्यात आली आहे. या मोहिमेनंतर मानवयुक्त मोहीम पार पाडली जाईल. क्रू एस्केप सिस्टीमच्या चाचणीसाठी सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये चाचणी वाहन ठेवण्यात आले आहे.

हेही जाणून घ्या…

गगनयानांतर्गत 3 जणांचा चमू 3 दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या 400 कि.मी. वरच्या कक्षेत पाठवला जाणार आहे.
भारत या मोहिमेत यशस्वी झाला तर असे करणारा तो चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, चीन आणि रशियाने हे यश मिळविले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी 2018 ला स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात गगनयान मोहिमेची घोषणा केली होती.

Back to top button