घटलेला मान्सून आणि कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे अर्थव्यवस्थेपुढे चिंता : अर्थ मंत्रालय | पुढारी

घटलेला मान्सून आणि कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे अर्थव्यवस्थेपुढे चिंता : अर्थ मंत्रालय

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होणारी वाढ आणि ऑगस्ट महिन्यात मान्सूनच्या पावसाअभावी खरीप आणि रब्बी पिकांवर होणारा परिणाम यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. या दोन्ही गोष्टींमुळे महागाई वाढण्याची शक्यता अर्थव्यवस्थेसाठी त्रासदायक ठरू शकते, अशी चिंता अर्थ मंत्रालयाने व्यक्त केली आहे. अर्थात, शहरी भागात वाढणारा खप बेरोजगारी घटल्याचे निदर्शक असल्याचेही अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने ऑगस्ट महिन्यातील आर्थिक घडामोडींचा आढावा घेणारा अहवाल जारी केला. या अहवालात आर्थिक व्यवहार विभागाने म्हटले आहे की देशांतर्गत मागणीतील सातत्य आणि गुंतवणुकीमुळे विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशांतर्गत ढोबळ उत्पन्न (जीडीपी) 7.8 टक्के राहिला आहे. शहरी भागातील बेरोजगारी कमी झाल्याने खाजगी खप वाढण्यास मदत झाली आहे. खप वाढल्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी वाढली आहे. तसेच, बाह्य मागणी देखील देशांतर्गत वाढीला गती देण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरली असून पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीसाठी निर्यातीचे योगदान लक्षणीय असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे, की ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाईत घट झाली आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये प्रमुख क्षेत्रातील तसेच अन्नधान्याची महागाई कमी झाली आहे. सरकारचे शुल्क कपातीचे निर्णय आणि कडक आर्थिक धोरणामुळे जुलैमध्ये 11.31 टक्के असलेला अन्नधान्याच्या महागाईचा दर ऑगस्टमध्ये 9.9 टक्क्यांवर आला. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ त्रासदायक ठरू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति पिंप 95 डॉलरच्या जवळ पोहोचला आहे. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात पावसाअभावी खरीप आणि रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यातील तूट भरून काढली आहे, याकडेही आर्थिक आढावा अहवालामध्ये लक्ष वेधण्यात आले आहे.

Back to top button