कर्नाटकात आता तंबाखू खरेदीसाठी २१ वर्षांची अट | पुढारी

कर्नाटकात आता तंबाखू खरेदीसाठी २१ वर्षांची अट

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : बंगळूरसह राज्यभरातील हुक्का बारवर बंदी आणण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली आहे. त्याचबरोबर तंबाखू खरेदीसाठी २१ वर्ष वय करण्यात येणार आहे.

क्रीडा मंत्री नागेंद्र यांच्यासह आरोग्य विभागाची बैठक घेतल्यानंतर आरोग्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, हुक्का बारसह राज्यात तंबाखू उत्पादनावर नियंत्रण आणण्यासाठी कोप्टा कायद्यात सुधारणा करण्यात येईल. कठोर कारवाईची तरतूद करण्यात येणार आहे. हुक्का बारकडे युवक अधिक प्रमाणात आकर्षिले जात आहेत. यातून युवकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस यांच्या सहकार्यातून कारवाई करण्यात येईल. हुक्का बारमध्ये मादक वस्तूंची विक्री होते. त्यावर कारवाई करण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे.

शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य वस्तू विक्रीवर बंदी आहे. त्याचप्रमाणे मंदिर, प्रार्थना स्थळे, रुग्णालये परिसरात तंबाखूजन्य विक्रीस बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. पूर्वीच्या कोप्टा (कर्नाटक) तंबाखू प्रतिबंध कायदा) कायद्यात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी होती.

कायद्यात दुरुस्ती करणार

सध्याच्या कायद्यात सिगारेटबरोबरच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि विक्री करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. सध्या तंबाखू खरेदीसाठी १८ वर्षांची अट आहे. यामध्ये वाढ करून २१ वर्षे करण्यात येणार आहे. यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येईल, असेही गुंडूराव यांनी सांगितले

Back to top button