Parliament Special Session : नव्या संसदेत पहिल्याच दिवशी सीतारामन-खर्गे चकमक | पुढारी

Parliament Special Session : नव्या संसदेत पहिल्याच दिवशी सीतारामन-खर्गे चकमक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नव्या संसद भवनात मंगळवारी राज्यसभेच्या पहिल्या सत्रातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात महिला आरक्षणाबाबतच्या एका विधानावरून आणि जीएसटीच्या विषयावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. अखेर सभापती जगदीप धनकड यांना त्यात हस्तक्षेप करावा लागला.

राज्यसभेच्या नवीन सभागृहात बोलताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, राज्यांना जीएसटीचा परतावा वेळेवर मिळत नाही. काही राज्यांना तर जीएसटी, मनरेगा, कृषी, सिंचनसह विविध योजनांच्या अनुदानांची रक्कम वेळेत मिळत नाही. भाजप फक्त लोकशाहीच्या गप्पा मारते; पण अनेक राज्यांत लोकशाही पद्धतीने निवडून आलेली सरकारे पाडली आहेत. त्यावर निर्मला सीतारामन यांनी खर्गे यांचा जीएसटीबाबतचा आरोप निराधार असल्याचे सांगत राज्यांना तर दोन महिन्यांचे आगाऊ पैसे दिल्याचे सांगितले. खर्गे यांनी महिला आरक्षणाबाबत बोलताना अनुसूचित जातीच्या महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने राजकीय पक्ष कमकुवत महिलांना निवडणुकीत उतरवतात, असा आरोप केला. त्याला सीतारामन यांनी आक्षेप घेतला. सरसकट विधान करून महिलांचा अपमान करणे अस्वीकारार्ह असल्याचे त्या म्हणाल्या. हा वाद अधिक भडकत असल्याचे पाहून सभापतींनी दोन्ही नेत्यांना शांत केले.

Back to top button