‘देवाने माझी यासाठी निवड केली…” : महिला आरक्षण विधेयकावर PM मोदी काय म्हणाले? | पुढारी

'देवाने माझी यासाठी निवड केली..." : महिला आरक्षण विधेयकावर PM मोदी काय म्हणाले?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :आज संसदेच्‍या नवीन सभागृहात विशेष अधिवेशनाच्‍या कामकाजाला प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक मांडत, सभागृहाच्‍या कामाजाचा श्रीगणेशा केला. नारी शक्‍ती वंदन विधेयकाची त्‍यांनी घोषणा केली. महिलांची धोरणनिर्मितीमध्‍ये मोठी भूमिका आहे. महिला आरक्षण लागू करण्‍यासाठी देवाने माझी निवड केली आहे, असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले. (PM modi on Women’s Reservation Bill )

संसदेच्या नवीन इमारतीच्या मध्यवर्ती सभागृहात खासदारांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले, “महिला आरक्षण विधेयकावर बराच वेळ चर्चा झाली. अटलबिहारी वाजपेयींच्या राजवटीत अनेकवेळा महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले; पण विधेयक मंजूर होण्यासाठी पुरेसे बहुमत नसल्याने हे स्वप्न अधुरेच राहिले. महिला आरक्षण लागू करण्‍यासाठी देवाने माझी निवड केली आहे. हे स्‍वप्‍न पुढे नेण्याची संधी दिली आहे. आमचे सरकार आज दोन्ही सभागृहात महिलांच्या सहभागावर एक नवीन विधेयक आणत आहे.” (PM modi on Women’s Reservation Bill )

PM modi on Women’s Reservation Bill : मोदींच्‍या भाषणातील ठळक मुद्दे

  • महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याच्या कामासाठी देवाने माझी निवड केली आहे.
  • देशातील महिलांच्या नेतृत्वाखालील विकास प्रक्रियेला जगात मान्‍यता मिळाली आहे.
  • लोकसभेत सूचीबद्ध महिला आरक्षण विधेयकाला ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ असे म्हटले जाईल.
  • ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ हे सुनिश्चित करेल की अधिकाधिक महिला संसद आणि विधानसभेच्या सदस्य बनतील.
  • खेळापासून ते स्टार्टअप्सपर्यंत जीवनाच्या विविध क्षेत्रात भारतीय महिलांनी केलेले योगदान जग पाहत आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली. अधिकाधिक महिलांनी देशाच्या विकास प्रक्रियेत सामील व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
  • महिला आरक्षण विधेयकाचे उद्दिष्ट राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर महिलांचा धोरणनिर्मितीमध्ये अधिकाधिक सहभाग सक्षम करणे हा आहे.
  • 19 सप्टेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे. संसदेच्या नवीन इमारतीत या ऐतिहासिक प्रसंगी, सभागृहाचे पहिले कामकाज म्हणून, सर्व संसद सदस्यांना महिला शक्तीसाठी प्रवेशद्वार उघडण्याची सुरुवात या महत्त्वपूर्ण निर्णयाने केली जात आहे.

Back to top button