उपराष्ट्रपतींनी नव्या संसदेवर पहिल्यांदाच फडकवला तिरंगा | पुढारी

उपराष्ट्रपतींनी नव्या संसदेवर पहिल्यांदाच फडकवला तिरंगा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : संसदेच्या नवीन इमारतीवर रविवारी पहिल्यांदाच तिरंगा फडकवण्यात आला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संसद भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेतेही यावेळी उपस्थित होते. सीडब्ल्यूसीच्या बैठकीसाठी हैदराबादला असल्याने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मात्र हजर राहू शकले नाहीत.

सोमवारपासून जुन्या इमारतीतच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी गणेश चतुर्थीला संसद जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत हलवली जाईल. गणेश चतुर्थीपासूनच नवीन इमारतीत कामकाज सुरू होईल. विशेष अधिवेशनाच्या उर्वरित चार दिवसांचे कामकाजही तेथेच होईल.

नव्या संसदेत जी-20 देशांच्या सभापतींसह संसद-20 बैठक नवीन संसद 13 व 14 ऑक्टोबर रोजी जी-20 देशांतील सभापतींसाठी संसद-20 शीर्षकांतर्गत विशेष बैठकीचे आयोजन करणार आहे. निमंत्रित देशांच्या संसदेचे अध्यक्षही त्यात सहभागी होतील. संसद-20 गटाची ही नववी बैठक असेल.

Back to top button