विवाहित भावाच्या जागी अनुकंपा नोकरी मागण्यास बहीण अपात्र : कर्नाटक उच्च न्यायालय | पुढारी

विवाहित भावाच्या जागी अनुकंपा नोकरी मागण्यास बहीण अपात्र : कर्नाटक उच्च न्यायालय

बंगळूर; वृत्तसंस्था :  कर्नाटक नागरी सेवा अधिनियमात बहीण ही कुटुंबाच्या व्याख्येत येत नसल्याने दिवंगत विवाहित भावाच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मागण्यास बहीण अपात्र ठरते, असा निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.

कर्नाटक वीज मंडळात आपल्याला दिवंगत भावाच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जावी, या मागणीसाठी तुमकूर जिल्ह्यातील तिप्तूर येथील पल्लवी या महिलेने अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आल्यावर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

तिची ही याचिका फेटाळताना न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. कृष्णा दीक्षित यांनी म्हटले की, कर्नाटक नागरी सेवा अधिनियमाच्या नियम क्र. २ (१) (ब) नुसार दिवंगत पुरुष सरकारी कर्मचाऱ्यासाठी असलेल्या कुटुंबाच्या व्याख्येत त्याच्यावर अवलंबून असणारी पत्नी, मुलगी अथवा मुलगा यांचाच समावेश होतो. तेच अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी पात्र ठरतात. त्यात बहिणीचा समावेश नाही. त्यामुळे याचिकाकर्ती व्यक्ती ही आपल्या दिवंगत भावाच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मागू शकत नाही. पल्लवी यांनी आपणही भावाच्या कुटुंबाचा घटक असून, भावावरच अवलंबून असल्याने आपल्याला नोकरीचा अर्ज करता यायला हवा, अशी बाजू याचिकेत मांडली होती.

Back to top button