राष्ट्रवादीवर ताबा कुणाचा; सहा ऑक्टोबरला सुनावणी | पुढारी

राष्ट्रवादीवर ताबा कुणाचा; सहा ऑक्टोबरला सुनावणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा कुणाचा, शरद पवार की अजित पवार या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने सहा ऑक्टोबरला दोन्ही गटांना सुनावणीसाठी पाचारण केले आहे. आयोगाच्या सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने शरद पवार यांच्याविरोधात बंडखोरी करून पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील फाटाफुटीनंतर शरद पवार गटाने शिंदे सरकारला पाठिंबा देणार्‍या मंत्र्यांना आणि आमदारांना निलंबित करण्याची घोषणा केली. तर अजित पवारांनी आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचे म्हणत पक्षावर ताबा सांगितला. यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. या प्रकरणात उपलब्ध असलेल्या एकूण तांत्रिक माहितीचा विचार केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असल्याच्या निष्कर्षावर आयोग पोहोचला आहे.

दोन्हीही गट आपणच खरा पक्ष असल्याचा दावा करत असल्याने, निवडणूक चिन्हासंदर्भातील नियमानुसार आयोगाने या प्रकरणाचा ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यानुसार, आयोगाने दोन्ही गटांना 6 ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी वैयक्तिकरीत्या किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत, असे सूत्रांकडून कळले.

Back to top button