दिल्लीत राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या विमानांवर निर्बंध नाहीत | पुढारी

दिल्लीत राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या विमानांवर निर्बंध नाहीत

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जी-20 शिखर परिषदेच्या नेत्यांसाठी राष्ट्रपतींनी दिलेल्या मेजवानी सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. यामुळे आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. त्यात, राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या विमानांना दिल्लीत उतरण्याची परवानगी दिली नसल्याच्या आरोपांची भर पडली. मात्र गृहमंत्रालयाने हे आरोप स्पष्ट शब्दात नाकारले. राज्यपालांचे अथवा मुख्यमंत्र्यांचे विमान दिल्लीत उतरण्याबाबत कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत, असे गृहमंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

राष्ट्रपतींच्या मेजवानीमध्ये सहभागी न होण्यामागे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत दिल्लीत विमान उतरण्याची परवानगी नसल्याचे कारण दिले आहे. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही दिल्लीला नो फ्लाइंग झोन म्हणून जाहीर करण्यात आले असल्याने कसे जाता येईल असा सवाल केला होता. गृहमंत्रालयाने मात्र, दोन्हीही मुख्यमंत्र्यांचा दावा नाकारला. जी-20 शिखर परिषदेसाठी हवाई सुरक्षा वाढवण्यात आली आली आहे. परंतु, कोणत्याही राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांच्या विमानाच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली नाही आणि मुख्यमंत्र्यांचे विमान उतरण्यावरही निर्बंध घातलेले नाही, असे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. केवळ खासगी चार्टर्ड विमानांनाच गृहमंत्रालयाच्या विशेष परवानगीची आवश्यकता असल्याची पुस्तीही या प्रवक्त्याने जोडली.

काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा मेजवानीवर बहिष्कार

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना डावलून मुख्यमंत्र्यांना राष्ट्रपतींच्या मेजवानीचे निमंत्रण दिल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त करीत पक्षाच्या तीन मुख्यमंत्र्यांनी या मेजवानीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Back to top button