

पुढारी ऑनलाइन डेस्क : G20 Dinner : G20 शिखर परिषदेसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या G20 डिनरसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आमंत्रित करण्यात आले नाही. यावरून विरोधी पक्ष काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. तर मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील यावर आता आपले मौन सोडले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी G20 साठी आयोजित केलेल्या डिनरचे आमंत्रण न मिळाल्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी अखेर या विषयावर आपले मौन सोडले आहे. त्यांनी राजकारण करायला नको होते, असा थेट हल्ला खरगे यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी देखील याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले देशातील 60 टक्के लोकसंख्येचे जे नेते आहेत, त्यांना महत्व न देणे, हे सरकारच्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी खर्गे यांना आमंत्रित न करणे हा थेट लोकशाहीवरील हल्ला आहे, असे म्हटले आहे.
खरगे यांच्या वगळण्यावर, तामिळनाडू काँग्रेसचे नेते मोहन कुमारमंगलम यांनी जातीय भेदांवर स्पष्ट शब्दांत "मोदी है तो मनु है" असे म्हटले.
काँग्रेस अध्यक्षांना निमंत्रित केले नसले तरी या डिनरसाठी इतर राज्यातील मुख्यमंत्री जिथे विरोधी पक्षांची सत्ता आहे त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना या डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पैकी ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन यांनी आधीच डिनरमध्ये सहभागी होणार असल्याची पुष्टी केली आहे. तर नितीशकुमार आधीच दिल्लीला रवाना झाले आहेत.
राष्ट्रपतींचे G20 डिनर शनिवारी प्रगती मैदानातील अगदी नवीन भारत मंडपम येथे आयोजित केले जाईल. ज्यामध्ये भारतीय खाद्यपदार्थांचा समावेश असलेल्या मेनूमध्ये बाजरी, देशाने प्रोत्साहन दिलेले धान्य यावर विशेष भर दिला जाईल. कार्यक्रमाच्या भव्यतेत भर घालत, जागतिक नेत्यांसाठी शास्त्रीय आणि समकालीन संगीताच्या विविध शैलींचा तीन तासांचा कार्यक्रम सादर केला जाईल.
हे ही वाचा :