जी-20 : भारतात जागतिक महाशक्ती एकवटल्या | पुढारी

जी-20 : भारतात जागतिक महाशक्ती एकवटल्या

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जगातील 20 बलशाली आणि आर्थिक शक्ती असलेल्या राष्ट्रांच्या जी-20 संघटनेची शिखर परिषद शनिवारपासून (दि. 9) नवी दिल्लीत सुरू होत आहे. जागतिक अर्थव्यवस्था, हवामान बदल, एआय, क्रिप्टो करन्सी, अन्नसुरक्षा आदी महत्त्वाच्या विषयांवर या परिषदेत मंथन होणार असून, जगाला भेडसावणार्‍या प्रश्नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न जी-20 संघटना करणार आहे. या परिषदेसाठी जागतिक नेत्यांचे आगमन झाले असून, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांपासून नव्याने सदस्य होणार्‍या आफ्रिकी समुदायापर्यंत सारे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या या परिषदेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले असून, या सार्‍याचा केंद्रबिंदू प्रगती मैदानावर उभारण्यात आलेला दिमाखदार ‘भारत मंडपम्’ असणार आहे.

गेल्यावर्षी इंडोनेशियात बाली येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेनंतर यंदाच्या बैठकीचे यजमानपद भारताकडे सुपूर्द करण्यात आले. मागील वर्षभर जी-20 च्या विविध विषय गटांच्या 200 हून अधिक बैठका भारताच्या विविध शहरांत झाल्या. आता जी-20 मधील सर्व राष्ट्रप्रमुखांची शिखर बैठक 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होत आहे. दिल्लीतील प्रगती मैदानावर नव्याने उभारण्यात आलेल्या ‘भारत मंडपम्’च्या भव्य वास्तूत दोन दिवस जगासमोरील विविध समस्यांवर सर्वोच्च नेते विचार मंथन करणार आहेत.

विविध विषयांवर विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले असून, दोन दिवसांच्या मंथनानंतर संघटनेच्या सामायिक निवेदनात कोणत्या मुद्द्यांवर सर्वसहमती होते, हे पाहणे जगासाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली बलशाली भारताचे दर्शन

जी-20 च्या अध्यक्षपदामुळे भारताला जगासमोर आपली प्रतिमा उजळण्याची व संघटनेचा अजेंडा ठरवण्याची संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी-20 चे आयोजन करण्यात आले. बलशाली भारताचे जगाला दर्शन घडवण्यासोबतच जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी भारताला मिळाली. पंतप्रधान मोदी यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही थीम ठरवत भारताचे जगातील महत्त्व अधोरेखित केले. काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशात जी-20 च्या बैठका घेत भारताने चीन व पाकिस्तानला सज्जड इशारा देतानाच आपण किती कणखर आहोत, हे दाखवून दिले. जागतिक अर्थव्यवस्थेत भारत करत असलेली घोडदौड आर्थिक बाबींवर निर्णय घेताना जी-20 ला विचारात घ्यावीच लागणार आहे.

15 नेत्यांसोबत होणार मोदींच्या द्विपक्षीय बैठका

जी-20 शिखर परिषदेसाठी आलेल्या जागतिक नेत्यांसमवेत येत्या तीन दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंधराहून अधिक द्विपक्षीय बैठका होणार आहेत. यामध्ये अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, इटली या प्रमुख देशांचा समावेश आहे. यात व्यापार, आर्थिक, तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील परस्पर सहकार्याचा आढावा घेण्याबरोबरच दहशतवादाला प्रतिबंध, सामरिक सुरक्षा आणि वैश्विक पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवरदेखील चर्चा होईल.

नवीन सदस्य येणार

दिल्लीत होणार्‍या शिखर परिषदेमध्ये जी-20 चे 20 देश सहभागी होत असले, तरी आगामी वर्षापासून आफ्रिकन युनियनला नवीन सदस्य म्हणून सहभागी करून घेण्यात येणार असल्याने आता ही संघटना ‘जी-21’ होणार आहे. आफ्रिकन युनियनला सहभागी करून घेण्याबाबत भारतानेच जोर लावला होता.

Back to top button