जी-20 परिषदेसाठी बायडेन आज भारतात; PM मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा

जी-20 परिषदेसाठी बायडेन आज भारतात; PM मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : येत्या 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीत जी-20 शिखर परिषद होत असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी दिल्लीत दाखल होत आहेत. शुक्रवारीच त्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार असून, या दोन नेत्यांमध्ये स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदल यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

जी-20 परिषदेसाठी सदस्य तसेच निमंत्रित देशांच्या प्रमुखांचे आगमन राजधानीत बुधवारपासून सुरू झाले आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जुगनाथ गुरुवारी दिल्लीत दाखल झाले. भारतात येणार्‍या सर्व राष्ट्रप्रमुखांच्या स्वागताची जबाबदारी विविध केंद्रीय मंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे. दिल्लीत शुक्रवारी पोहोचल्यानंतर बायडेन यांचा मुक्काम 'आयटीसी मौर्य' येथे असेल. ते शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.

दोन नेत्यांच्या चर्चेत असू शकतात हे मुद्दे

आशिया खंडात विशेषतः भारताचे प्रभाव क्षेत्र असलेल्या दक्षिण आशियामध्ये चिनी वर्चस्वाला चाप लावण्याच्या रणनीतीवरही मंथन अपेक्षित आहे. बांगला देश या परिषदेमध्ये विशेष निमंत्रित असून, तिथे पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पंतप्रधान मोदी यांच्यातही द्विपक्षीय बैठक होणार आहे. पारदर्शक निवडणुकांसाठी अमेरिकेकडून बांगला देशवर आणला जाणारा दबाव भारताने रोखावा, अशी हसीना यांची अपेक्षा आहे. कारण, त्याद्वारे चीनला बांगला देशात लुडबुड करण्याची संधी मिळू शकते, असे भारताचे म्हणणे आहे. त्यामुळे हा मुद्दा अमेरिका आणि भारत यांच्यातील चर्चेदरम्यान असणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यातही द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे.

हे राष्ट्रप्रमुख येणार

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्झ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा, युरोपिय महासंघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन हे नेतेदेखील जी-20 परिषदेसाठी येणार आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे या परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. रशियाचे प्रतिनिधीत्व परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह आणि चीनचे प्रतिनिधीत्व पंतप्रधान ली कियांग करतील.

विविध हॉटेलांत व्यवस्था

या परिषदेच्या निमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान सुनाक यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. 'शांग्री ला' हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य असेल. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो इंडोनेशियातील आसियान शिखर परिषदेमधील हजेरीनंतर दिल्लीत पोहोचणार असून, 'द ललित' हॉटेलमध्ये ते राहतील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज नवी दिल्लीत 'इम्पीरियल' हॉटेलमध्ये वास्तव्याला असतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news