India Or Bharat : इंडिया, की भारत? काय आहे भारत, इंडियाचा इतिहास?

India Or Bharat
India Or Bharat
Published on
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था India Or Bharat : जी-20 परिषदेच्या कार्यक्रम (निमंत्रण) पत्रिकेत परंपरेप्रमाणे 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया'ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' नमूद करण्यात आले आणि नव्या वादाला तोंड फुटले. काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सरकारवर टीका करताना 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' असे नमूद करायला हवे होते, असे स्पष्ट केले. विरोधकांनी सरकारविरोधात इंडिया आघाडी उघडल्याने पत्रिकेत हा बदल करण्यात आला, असेही काहींचे म्हणणे आहे. सरकारच्या या कृतीचे समर्थन करताना 'भारत' हेच देशाचे खरे नाव आहे. इंडिया हे परकीयांनी दिलेले नाव असून, वसाहतवादाच्या दास्याचे प्रतीक आहे, अशी भूमिका अनेकांनी मांडली. महत्त्वाचे म्हणजे अशीच भूमिका 1949 पासून वारंवार अनेकांकडून मांडली गेली आहे.भारतीय संविधानाच्या हिंदी प्रस्तावनेत हम भारत के लोग, असे नमूद आहे, तर इंग्रजी प्रस्तावनेत वुई द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत, असे नमूद आहे.

India Or Bharat : भारत लिहिणे घटनासंमत

'प्रेसिडेंट ऑफ भारत' लिहिणे घटनाबाह्य आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संविधानाच्या इंग्रजी प्रस्तावनेतच त्याचे उत्तर आले आहे. इंडिया दॅट इज भारत, असे इंग्रजी प्रस्तावनेतही स्पष्टपणे नमूद आहे. भारतऐवजी हिंदुस्तान, आर्यावर्त वा जंबुद्वीप लिहिले असते तर ते एकवेळ घटनाबाह्य मानले गेले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौर्‍याच्या कार्डवर आता 'प्राईममिनिस्टर ऑफ भारत' लिहिण्यात आलेले आहे.

India Or Bharat : भारताचे नाव 'भारत' का आहे,

यामागे दोन कथा विशेषत्वे प्रचलित आहेत.

1) ऋषभदेव यांचा मुलगा भरत याच्या नावावर भारत हे या देशाचे नामकरण झाले, असा उल्लेख विष्णुपुराणात आहे.

ततश्च भारतं वर्षमेतल्लोकेषु गीयते
भरताय यत: पित्रा दत्तं प्रातिष्ठता वनम्
ऋषभ यांनी वानप्रस्थाश्रमाला रवाना होण्यापूर्वी आपले राज्य भरत यांना दिले. तेव्हापासून हा देश भारतवर्ष या नावाने ओळखला जाऊ लागला, असा त्याचा एकुणात अर्थ आहे.
सोभिचिन्तयाथ ऋषभो भरतं पुत्रवत्सल:
ज्ञानवैराग्यमाश्रित्य जित्वेन्द्रिय महोरगान्।
हिमाद्रेर्दक्षिण वर्षं भरतस्य न्यवेदयत्।
तस्मात्तु भारतं वर्ष तस्य नाम्ना विदुर्बुधा:।

असा एक श्लोक लिंगपुराणात आहे. ऋषभ यांनी हिमालयाच्या दक्षिणेकडील राज्य पुत्र भरताला सोपविले, तेव्हापासून भारतवर्ष हे या देशाचे नाव पडले. भागवत पुराणातही याच अर्थाचा एक श्लोक आहे.

India Or Bharat : जैन धर्म काय म्हणतो?

जैन धर्मानुसारही भगवान ऋषभदेव यांच्या मुलाच्या (भरताच्या) नावावरून देशाचे नाव भारत पडल्याची मान्यता आहे. जैन साहित्यानुसार 'नाभीवर्ष' असे आणखी एक नावही या देशाला देण्यात आले आहे.

2) ही कथा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र भरताची आहे. महाभारताच्या आदिपर्वातील दुसर्‍या अध्यायात श्लोक क्र. 96 नुसार….
शकुन्तलायां दुष्यन्ताद् भरतश्चापि जज्ञिवान
यस्य लोकेषु नाम्नेदं प्रथितं भारतं कुलम्
महर्षी कण्व यांच्या आश्रमात जन्मलेल्या भरताच्या नावावर भरतवंश जगात लौकिक पावला.
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ॥

विष्णुपुराणातील या श्लोकात समुद्राच्या उत्तरेला व हिमालयाच्या दक्षिणेला जो देश आहे, तो भारत होय, अशी थेट व्याख्याच आलेली आहे. ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणातही दुष्यंतपुत्र भरताच्या नावाने 'भारत' हे देशाचे नाव पडल्याचा तर्क आहे.

India Or Bharat : 'इंडिया' शब्दाला विरोध जुना…आणि केवळ 'भारत' नावाची मागणीही जुनी

17 सप्टेंबर रोजी संविधान सभेत संघाच्या नावाबद्दल चर्चा झाली. तेव्हा फॉरवर्ड ब्लॉकचे सदस्य हरी विष्णू कामत देशाचे नाव केवळ भारत हे असावे, इंडिया वगळावे, असे सुचविले होते. सेठ गोविंद दास यांनीही हाच आग्रह धरला होता. मात्र, भारत या नावासह इंडिया हे नावही कायम राहिले. काँग्रेसचे तत्कालीन खासदार शांताराम नाईक यांनी राज्यसभेत इंडिया ऐवजी भारत शब्द वापरावा, अशा मागणीचे विधेयक सादर केले होते. ते गोवा काँग्रेसचे अध्यक्षही होते. योगी आदित्यनाथ यांनी अशाच मागणीचे खासगी विधेयक सादर केले होते.
मध्ये सर्वोच्च न्यायालयात अशाच मागणीची एक याचिका दाखल झाली होती.

India Or Bharat : हिंद, हिंदुस्तान शब्दाचा इतिहास

हिंद वा हिंदुस्तान शब्दाचा इतिहास 2500 वर्षांपूर्वीचा मानला जातो. 'स' ऐवजी 'ह' बोलणार्‍या लोकांनी सिंधचे उच्चारण 'हिंद' असे केले. पुढे सिंधू संकृतीशी संबंधित लोकांना हिंदू म्हटले जाऊ लागले. इ. स. 262 मध्ये इराणचा सासानी सम्राट शापुर (पहिला) याच्या नक्श-ए-रुस्तम या शिलालेखात हिंदुस्तान शब्दाचा उल्लेख आहे.

हिंदुकुश पर्वतापलीकडील क्षेत्र म्हणूनही हिंदुस्तान नाव पडल्याचा एक मतप्रवाह आहे. अरब या देशाला 'अल हिंद' म्हणत असत.
तुर्क आक्रमक, दिल्लीचे सुलतान, बादशहा आदींनी आपापल्या प्रभुत्वाखालील भारतीय भूभागाला हिंदुस्तान म्हटलेले आहे.

India Or Bharat : 'इंडिया' नावाची जन्मकथा

सिंधू नदीला ग्रीक भाषेत 'इंडस' म्हटले जाते. इंडस शब्द लॅटिनमधून ग्रीक भाषेत आयात झाला. ग्रीक (युनान) इतिहासकार हेरॉडॉटस याने इ.स.पूर्व 440 मध्ये इंडिया शब्दाचा वापर पहिल्यांदा केल्याचा उल्लेख सापडतो. इंडिया स्वर्गासारखा आहे. जमीन सुजलाम्-सुफलाम् आहे, असे हेरॉडॉटसने नमूद केले होते. इ.स.पूर्व 300 मध्ये ग्रीक राजदूत मॅगेस्थँनिसने सिंदू पलीकडील भूभागासाठी इंडिया शब्दाचा वापर केला. (चाणक्य-चंद्रगुप्त मौर्यकाळ) एकोणिसाव्या शतकात इंग्रजांनी 'इंडिया' हा शब्द प्रचलित केला. जगातही त्यामुळे हे नाव रूढ झाले.

India Or Bharat : भारत देशाची नावे

मेलुहा (भारतीय उपखंडासाठी वापरल्या जाणार्‍या सर्वात जुन्या नावांपैकी एक. मेसोपोटेमियन ग्रंथातही नमूद) जम्बुद्वीप भारतखण्ड हिमवर्ष अजनाभवर्ष नाभीवर्ष भारतवर्ष भारत आर्यावर्त हिंद हिन्दुस्तान हिंदोस्ताँ हिंदुस्थान इंडिया. सर्वाधिक प्रचलित भारत.

India Or Bharat : फक्त भारत नावासाठी काय करावे लागेल?

इंडियन पिनल कोडऐवजी भारतीय न्याय संहिता या शब्दाच्या वापरासाठी सरकारने विधेयक आणले आहे. इंडिया नाव रद्द करून फक्त भारत करायचे तर तेही कलम 368 नुसार दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करून घ्यावे लागेल. सिलोनचे 'श्रीलंका'! रामायणात लंकेचा उल्लेख ख्यात आहे. लंकेचे नामकरणही इंग्रजांनी सिलोन केले होते. 4 फेब्रुवारी 1948 ला इंग्रज येथून गेल्यावरही 1972 पर्यंत या देशाचे नाव सिलोनच होते. 1972 मध्ये राष्ट्रीय गौरव म्हणून लंका या नावाची पुनर्स्थापना करण्यात आली. पुढे आदरार्थी श्री नव्याने जोडण्यात आला. 'श्रीलंका' हेच आता इंग्रजीतूनही लंकेचे नाव आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news