पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने चंद्रावर भारताच्या चांद्रयान-3 लँडिंग साइटची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. 23 ऑगस्टरोजी चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले होते. चांद्रयान-3 ची लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून सुमारे 600 किलोमीटर अंतरावर आहे. ही छायाचित्रे नासाच्या लूनर रिकॉनिसेंस ऑर्बिटरने (Lunar Reconnaissance Orbiter) 27 ऑगस्टरोजी घेतली आहेत. नासाने पांढऱ्या वर्तुळात उतरण्याची जागा दाखवली आहे. (Chandrayaan-3)
ही छायाचित्रे चंद्राच्या कक्षेत फिरणाऱ्या नासाच्या लूनर रिकॉनिसेंस ऑर्बिटर (LRO) ने 27 ऑगस्टरोजी काढली होती. विक्रम लँडर 23 ऑगस्टरोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर उतरला होता. यापूर्वी, इस्रोने विक्रम लँडरची 3D छायाचित्रे शेअर केली होती. इस्रोने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ही छायाचित्रे प्रज्ञान रोव्हरने लँडरपासून 15 मीटर अंतरावर म्हणजे सुमारे 40 फूट अंतरावरून क्लिक केली होती.
नासाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, LRO ने चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या चांद्रयान-3 च्या लँडरची उपग्रह छायाचित्रे घेतली. नासाने छायाचित्रामध्ये लँडरला एका बॉक्सच्या आत दाखवले आहे. लँडरच्या आजूबाजूला दिसणारा प्रकाश धूळ आणि चंद्राच्या मातीच्या संपर्कात येण्याने बनलेला आहे.
विक्रम लँडरची ही छायाचित्रे प्रज्ञान रोव्हरवर बसवलेल्या दोन नेव्हिगेशन कॅमेरांच्या मदतीने घेतली आहेत. इस्रोने म्हटले आहे की, ही 3-चॅनेलची छायाचित्रे आहेत. हे खरं तर दोन छायाचित्रेंचे मिश्रण आहे. एक छायाचित्रे लाल चॅनेलवर आहे. दुसरी ब्लू आणि ग्रीन चॅनेलवर आहे. दोन्ही एकत्र करून ही छायाचित्रे बनली आहेत. या छायाचित्रे 3D चष्माने पाहिल्यास विक्रम लँडर 3D मध्ये दिसेल.
इस्रोने 4 सप्टेंबर रोजी विक्रम लँडरला स्लीप मोडमध्ये ठेवले होते. यापूर्वी 2 सप्टेंबर रोजी प्रज्ञान रोव्हरला स्लीप मोडमध्ये ठेवले होते. शास्त्रज्ञांना आशा आहे की, 22 सप्टेंबर 2023 रोजी पुन्हा विक्रम लँडर पुन्हा कार्यान्वित शकतो. लँडरने स्लीप मोडमध्ये जाण्यापूर्वी पेलोड्सच्या माध्यमातून चंद्रावर नवीन ठिकाणांची तपासणी केली होती. त्यानंतरच विक्रम लँडरला झोपण्याचे कमांड दिले गेले. सध्या सर्व पेलोड्स बंद आहेत. फक्त रिसीवर ऑन आहे, जेणेकरून ते बंगळूरमधून कमांड घेऊन पुन्हा काम करू शकेल.
इस्त्रोने (ISRO) ने 23 ऑगस्टरोजी 30 किलोमीटरच्या उंचीवरून संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांनी ऑटोमॅटिक लँडिंग प्रोसेस सुरू केली होती. आणि पुढील 20 मिनिटांत प्रवास पूर्ण केला होता.
चांद्रयान-3 ने 40 दिवसांत 21 वेळा पृथ्वी आणि 120 वेळा चंद्राची परिक्रमा केली. चंद्रयानने चंद्रापर्यंत 3.84 लाख किलोमीटर अंतर काढण्यासाठी 55 लाख किलोमीटरची यात्रा केली.
हेही वाचा