पुढारी ऑनलाईन डेस्क : चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेमुळे भारताने अवकाश क्षेत्रात नवीन इतिहास रचला आहे. भारताच्या या उल्लेखनिय कामगिरीचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारकडून खास महाप्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात यश मिळवणाऱ्या टॉप स्पर्धकांना १ लाख रूपयांचे बक्षीसं जिंकण्याची संधी मिळणार आहे. याची माहिती इस्रोने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वरून दिली आहेत. (Chandrayaan-3 MahaQuiz)
इस्रोने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 'चांद्रयान महाक्विज' स्पर्धेचे लाईव्ह आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सर्व भारतीय नागरिकांना सहभागी होता येणार आहे. यासाठी https://isroquiz.mygov.in/ या लिंकवर क्लिक करून तुम्हाला देखील स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. (Chandrayaan-3 MahaQuiz)
भारताच्या आश्चर्यकारक अंतराळ संशोधन प्रवासाचा गौरव करण्यासाठी, चंद्राच्या चमत्कारांचा शोध घेण्यासाठी आणि विज्ञान आणि शोधावरील आपले प्रेम प्रदर्शित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असेही इस्रोने स्पष्ट केले आहे.
या महाप्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. "मी विद्यार्थ्यांना चांद्रयान ३ महाक्विझमध्ये सहभागी होण्याची विनंती करतो. यामुळे त्यांना देशाच्या चंद्र मोहिमेची माहिती घेण्यास मदत होईल."
'चांद्रयान महाक्विज' स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रथम विजेत्या स्पर्धकाला ₹ 1,00,000 (एक लाख रुपये). द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला ₹ 75,000 (पंचाहत्तर हजार रुपये) तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला ₹ 50,000 (पन्नास हजार रुपये) बक्षीस देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पुढील १०० सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना प्रत्येकी ₹ 2000 (दोन हजार) रूपयांचे बक्षीस असेल तर पुढील आणखी २०० जणांना प्रत्येकी ₹ 1000 (एक हजार रूपये) देण्यात येणार आहेत, असेही इस्रोकडून वेबसाईटला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.