Bypolls २०२३ : ६ राज्यातील ७ विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू | पुढारी

Bypolls २०२३ : ६ राज्यातील ७ विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांवर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या विधानसभा जागांमध्ये उत्तर प्रदेशातील घोसी, पश्चिम बंगालमधील धुपगुरी, केरळमधील पुथुपल्ली, उत्तराखंडमधील बागेश्वर, झारखंडमधील डुमरी आणि त्रिपुरातील बॉक्सनगर आणि धनपूर यांचा समावेश आहे. ८ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारी ही पोटनिवडणूक भाजप आणि I.N.D.I.A. आघाडीसाठी महत्वाची लढाई मानली जात आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशमधील घोसी येथील जागेकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. या जागेवर भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये मुख्य लढत होत आहे.

६ राज्यांतील ७ जागांसाठी पोटनिवडणूक

धूपगुरी, पुथुपल्ली, बागेश्वर, डुमरी आणि बॉक्सानगर येथील विद्यमान आमदारांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. तर घोसी आणि धानपूरच्या आमदारांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. सपा आमदार दारा सिंह चौहान यांच्या राजीनाम्यामुळे घोसीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. सपाचा राजीनामा दिल्यानंतर दारा सिंह चौहान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता घोसी पोटनिवडणुकीत भाजपने दारा सिंह यांना सपा विरोधात उभे केले आहे. दारा सिंह हे सपाचे उमेदवार सुधाकर सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

उ.प्र. तील घोसी पोटनिवडणूक सपा आणि भाजपसाठी महत्त्वपूर्ण का?

दारा सिंह चौहान यांनी समाजवादी पक्षाच्या आमदारपदाचा राजीनामा दिल्याने उत्तर प्रदेशातील घोसीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. चौहान यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. पोटनिवडणुकीसाठी भाजपने चौहान यांना सपाचे सुधाकर सिंह यांच्या विरोधात उभे केले आहे. चौहान यापूर्वी २०१२ ते २०१७ या काळात घोसी येथे आमदार होते. त्यानंतर लागोपाठ विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. काँग्रेस आपल्या ‘इंडिया’ आघाडीतील मित्रपक्ष सपाला पाठिंबा देत आहे. घोसी पोटनिवडणूक ही सपा आणि भाजपसाठी महत्त्वाची आहे, कारण विरोधी आघाडी ‘इंडिया’च्या स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक आहे.

‘INDIA’ आघाडीच्या स्थापनेनंतर पहिलीच निवडणूक

सहा राज्यांमध्ये आज पोटनिवडणूक होत असल्याने, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विरुद्ध विरोधी गट भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी (इंडिया) च्या ताकदीचा हा पहिलाच सामना असेल. या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने ही पोटनिवडणूक महत्वाची मानली जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button