

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. सोनिया यांना सौम्य तापाची लक्षणे जाणवल्याने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल गांधी आई सोनिया गांधींना (Sonia Gandhi) भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत, अशी माहिती एएनआयच्या सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, डॉक्टर त्यांच्या (Sonia Gandhi) प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. कोविडनंतर त्यांची प्रकृती अनेक वेळा खालावली आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.
यापूर्वी २०२३ मध्ये सोनिया गांधी यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १२ जानेवारी २०२३ रोजी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात श्वसन संसर्गाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या उपचारानंतर त्यांना १७ जानेवारी २०२३ रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी सध्या राजकारणात सक्रिय दिसत आहेत. महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दोन दिवशी देशातील विरोधी पक्षाच्या 'इंडिया' आघाडीची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसकडून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह खासदार सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी हे देखील उपस्थित होते. मुंबई येथील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये आयोजित 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत काँग्रेसकडून सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा सक्रीय सहभाग होता. यापूर्वी बेंगळुरू येथे झालेल्या विरोधी पक्षाच्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी सोनिया त्यांचा मुलगा राहुल गांधींसोबत काश्मीरमध्ये सुट्टी घालवण्यासाठी देखील गेल्या होत्या.