INDIA Bloc Press Conference : भयमुक्त भारतासाठी आम्ही सर्वजण एकत्र : उद्धव ठाकरे

INDIA Bloc Press Conference : भयमुक्त भारतासाठी आम्ही सर्वजण एकत्र : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात इंडिया आघाडी मजबूत होत आहे. भ्रष्टाचार विरोधात आम्ही एकत्र लढत असून भयमुक्त भारतासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे. विरोधक नाही तर देशप्रेमी एकत्र आले आहेत. सध्या सबकों लाथ मित्रोंका विकास असे सुरू आहे. या मित्र परिवाराविरुद्ध आम्ही लढा तिव्र करणार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी आपली भूमिका मांडली.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा मुकाबला करण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी 'इंडिया' आघाडीची बैठक मुंबईत सुरू आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी नेत्यांनी ग्रुप फोटो काढून एकतेचा संदेश दिला. याशिवाय समन्वय समितीमधील नावांची घोषणा करण्यात आली. बैठकीत वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीमध्ये शरद पवार, संजय राऊत, हेमंत सोरेन, केसी वेणूगोपाल, तेहस्वी यादव, लल्लन सिंह, डी राजा, जावेद खान, एम के स्टॅलिन, अभिषेक बॅनर्जी, ओमर अब्दुल्ला, महबुबा मुफ्ती, राघव चढ्ढा या 13 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

इंडिया आघाडीचे उद्दिष्ट महागाई दूर करणे : खरगे

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मोदी कधीही गरिबांसाठी काम करत नाहीत. लोकांना दाखवण्यासाठी पैसे कमी करतात. ते 100 रुपये वाढवतात आणि रुपये कमी करतात. गॅस 900 रुपयांनी वाढवला. 200 रुपयांनी कमी केला. पण इंडिया आघाडीचे उद्दिष्ट महागाई दूर करणे हेच आहे. देश अडचणीत असताना मोदी चर्चा करत नाहीत. मोदी कुणालाही न विचारता निर्णय घेतात. आता सुद्धा न चर्चा करता संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले. हळूहळू हुमशाहीकडे प्रवास सुरू आहे. मणिपूर जळत असताना अधिवेशन बोलावले नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच अदानींची संपत्ती कुणामुळे वाढत आहे? असा सवाल त्यांनी यवेळी केला.

मोदींना हटवणारच, लालू यादव यांचा निर्धार

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव म्हणाले, मला आनंद आहे की आम्ही येथे एकत्र आहोत. सुरुवातीपासूनच आम्ही भाजपला हटवून देश वाचवण्यात मग्न आहोत. मी सुरुवातीपासूनच मोदींशी लढत आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. त्यांना दूर करूनच मी अखेरचा श्वास घेणार आहे, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत लालू यादव म्हणाले, हे लोक खोटे बोलून आणि अफवा पसरवून सत्तेत आले आहेत. आमचे पैसे स्विस बँकेत जमा आहेत, असे माझ्यासह अनेक नेत्यांबद्दल सांगण्यात आले. सत्तेत आल्यास सर्व देशवासीयांना पंधरा लाख रुपये देऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर लोकांना बँक खाती उघडायला लावली. जनता या सापळ्यात अडकली. त्यांनी सर्व कुटुंबासह बँकेत खाते उघडले. पण काय मिळाले हे सर्वांना माहीत आहे,' असा टोला त्यांनी लगावला.

मोदी सरकार हे स्वतंत्र भारतातील सर्वात भ्रष्ट सरकार : केजरीवाल

'इंडिया' ही काही पक्षांची अघाडी नसून देशातील 140 कोटी जनतेची आघाडी आहे. आपण एकत्र आलो आहोत कारण आपल्याला 21व्या शतकातील भारत घडवायचा आहे. देशातील मोदी सरकार हे स्वतंत्र भारतातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. हे सर्वात अहंकारी सरकार आहे. मोदी सरकार फक्त एका माणसाला वाचवण्यात व्यग्र आहे. देशात असे अहंकारी सरकार कधीच नव्हते. आम्ही पदासाठी नाही तर भारताला वाचवण्यासाठी पुढे आलो आहोत. पण आमची आघाडी तोडण्याचे प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहेत, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला.

संजय राऊत म्हणाले…

आमची आघाडी मजबूत आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक इंडिया आघाडी जिंकणार, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

इंडिया आघाडीचा 'मीडिया' कार्यगट :

जयराम रमेश (INC), मनोज झा (राजद), अरविंद सावंत (उद्धव ठाकरे गट), जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी), राघव चढ्ढा (आप), राजीव रंजन (जनता दल, यु.), प्रांजल (सीपीएम), आशिष यादव (सपा), सुप्रियो भट्टाचार्य (JMM), आलोक कुमार (JMM), मनीष कुमार (जनता दल, यु.), राजीव निगम (एसपी), भालचंद्र कानगो (भाकप), तन्वीर सादिक (एन.सी), प्रशांत कनोजिया, नरेन चॅटर्जी (AIFB), सुचेता डे, (CPI, ML), मोहित भान (पीडीपी) यांचा समावेश करण्यात आला आहे. तर यातील टीएमसी नेत्याचे नाव नंतर देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news