भारताने उभारले जगातील पहिले आपत्कालीन हॉस्पिटल | पुढारी

भारताने उभारले जगातील पहिले आपत्कालीन हॉस्पिटल

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भीष्म प्रकल्पांतर्गत भारतात जगातील पहिलेवहिले आपत्कालीन हॉस्पिटल उभे केले गेले आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हे हॉस्पिटल देशातील कोणत्याही ठिकाणी अवघ्या ८ मिनिटांत उभारले जाण्यासारखे आहे. कोठेही अचानक आपत्ती आल्यास तेथे अवघ्या ८ मिनिटांत हे तात्पुरते हॉस्पिटल उभे केले जाईल आणि तातडीने तेथे उपचारही सुरू करता येतील, अशी या हॉस्पिटलची रचना आहे.

हे आपत्कालीन हॉस्पिटल उभे करण्यासाठी ७२० किलो वजनाच्या ३६ लोखंडी बॉक्समधून आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवले जाते. वेळप्रसंगी हेलिकॉप्टरमधून हे बॉक्स खाली फेकले तरी ते सुरक्षित राहतात, अशी या लोखंडी बॉक्सची रचना असते. शिवाय, पाण्यापासूनही बचाव होतो.

पंतप्रधान मोदी यांनी गतवर्षी भीष्म प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने भीष्म टास्कची स्थापना केली. या प्रकल्पाचे प्रमुख एअर व्हॉईस मार्शल तन्मय राय यांनी या आपत्कालीन हॉस्पिटलमध्ये रक्त तपासण्यापासून एक्स-रे काढेपर्यंत आणि अगदी व्हेंटिलेटर्सपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध असतील, असे सांगितले. हे हॉस्पिटल सौरऊर्जा आणि बॅटरीवर चालणारे आहे. शिवाय, निर्यात करता येईल, असे हे मॉडेल असणार आहे.

हॉस्पिटलसाठी लागणारे सर्व साहित्य ३ फ्रेममध्ये प्रत्येकी १२ छोट्या बॉक्सच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल. या तिन्ही फ्रेमना एक छोटा जनरेटर लावलेला असणार आहे. फ्रेमच्या वर दोन स्ट्रेचरदेखील असतील. हे स्ट्रेचर ऑपरेशन करताना बेडसारखे वापरता येतील. प्रत्येक बॉक्समधील औषधासह सर्व साहित्य भारतीय बनावटीचे असेल. शॉक किट, एअर वे किट, ब्लिडिंग किट व अँटी बायोटिक किटचा या बॉक्समध्ये समावेश असणार आहे.

प्रत्येक आपत्कालीन हॉस्पिटल तयार करण्यासाठी प्रत्येकी दीड कोटी रुपयांचा खर्च येतो. भारत सरकार तीन देशांना हे आपत्कालीन हॉस्पिटल मोफत उपलब्ध करून देणार आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणे अपेक्षित आहे.

 

Back to top button