देशातील पहिली AI शाळा केरळात | पुढारी

देशातील पहिली AI शाळा केरळात

तिरुअनंतपूरम; वृत्तसंस्था : भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शाळा केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन करण्यात आले.

आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी येथील एका शाळेत एआय तंत्रज्ञान आधारित चॅट जीपीटी उपक्रमाद्वारे अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे शिक्षकांना कमी केले जाणार नसल्याचे व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. केरळची राजधानी तिरुअनंतपूरममध्ये देशातील पहिली एआय ही शाळा शांतिगिरी विद्याभवन उघडण्यात आली आहे.

एआय टुल्सच्या मदतीने, अभ्यासक्रम डिझाईन, शिक्षण, मूल्यांकन आणि शाळेतील विद्यार्थी समर्थन यांसह शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये त्याचा वापर केला जाणार आहे. या शाळेत पारंपरिक अध्यापन पद्धतीबरोबरच विद्यार्थ्यांना एआयच्या मदतीने प्रगत साधने आणि संसाधने दिली जातील. त्याच्या मदतीने विद्यार्थी भविष्यातील आव्हानांसाठी तयार होतील. विद्यार्थ्यांना शिकण्याची ही नवीन पद्धत चांगले शिक्षण देणार आहे. या शाळेत मुलांना अनेक शिक्षक, विविध स्तरांची चाचणी, अभियोग्यता चाचणी, समुपदेशन, करिअर नियोजन आणि स्मरण तंत्र याविषयी माहिती दिली जाते. अमेरिकेतील ई-लर्निंग इंजिन्स आणि वेदिक ई-स्कूलमध्ये या शाळेत एआय शिक्षणप्रणाली सुरू करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे.

या शाळेत मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्य विकासही शिकवला जातो. मुलाखत कौशल्ये, ग्रुप डिस्कशन, गणित आणि लेखन कौशल्ये, शिष्टाचारात सुधारणा, इंग्रजी याबद्दलही माहिती दिली जाते. शालेय परीक्षांव्यतिरिक्त मुलांना स्पर्धात्मक परीक्षांसाठीही तयार केले जाते. जेणेकरून विद्यार्थी स्पर्धेसाठी तयार होतील. शाळेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी नियोजन करण्यास मदत करते. हे त्यांना प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे, जेणेकरून विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ शकतील, अशी माहिती व्यवस्थापनाने दिली.

Back to top button