

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी लॅन्डर 'विक्रम' उतरले, त्या पाँईटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी शिवशक्ती नाव दिले. परंतु, या नावावर काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी आक्षेप नोंदवला आहे. विक्रमच्या लॅन्डिंग पाँईंटचे नाव शिवशक्ती ठेवणे हास्यास्पद आहे. पंतप्रधानांना चंद्राच्या पृष्ठभूमीचे नामकरण करण्याचा अधिकार नाही. संपूर्ण जग यामुळे आम्हावर हसेल. पंतप्रधान चंद्राचे मालक नाहीत. आपण चंद्रावर पोहचलो, ही अत्यंत चांगली बाब आहे. याचा आम्हाला गर्व आहे. परंतु, आम्ही चंद्राचे मालक नाही, अशा शब्दांमध्ये अल्वी यांनी टीकास्त्र डागले. (Rashid alvi)
चांद्रयान-१ चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले होते. त्या जागेचे नाव जवाहर पाँईंट ठेवण्यात आले आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना अल्वी म्हणाले की, जवाहरलाल नेहरू यांची तुलना करता येणार नाही. नेहरूंमुळेच आज इस्त्रो इथपर्यंत पोहचली आहे. १९६२ मध्ये विक्रम साराभाई आणि पंडित नेहरू यांनी इस्त्रोची स्थापना केली होती. परंतु, आता पंतप्रधान मोदी राजकारण करीत आहे, असा आरोप अल्वी (Rashid alvi) यांनी केला.
दरम्यान, काँग्रेसच्या आरोपांवर भाजपने तोंडसुख घेतले आहे. काँग्रेस हिंदूविरोधी चरित्र दर्शवत आहे, असे मत भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी व्यक्त केले. भगवान रामाच्या अस्तित्वावर काँग्रेसनेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राम मंदिराचा विरोध केला, हिंदुना शिव्या दिल्या, असे पूनावाला म्हणाले. चंद्रावरील दोन्ही पाँईंटचे 'शिवशक्ती' आणि 'तिरंगा' पाँईंट हे नाव देशाशी जुळले आहे. अल्वींना हे हास्यास्पद का वाटते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विक्रम लॅन्डरचे नाव विक्रम साराभाई यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. अगोदर परिवार हाच काँग्रेसचा सिद्धांत आहे. केवळ गांधी घराणे आणि जवाहरलाल नेहरुंची ते प्रशंसा करतात, अशा शब्दांत पूनावाला यांनी अल्वींच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
हेही वाचा