PM Modi : पंतप्रधानांनी दिल्लीकरांसाठी व्यक्त केली दिलगिरी: जाणून घ्या कारण… | पुढारी

PM Modi : पंतप्रधानांनी दिल्लीकरांसाठी व्यक्त केली दिलगिरी: जाणून घ्या कारण...

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी परराष्ट्र दौऱ्यावरून परतले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोदींचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी पालम विमानतळावर उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना पंतप्रधानांनी संबोधित केले. चंद्रयान-३ सह ब्रिक्स संमेलनात आलेले अनुभव यावेळी पंतप्रधान सांगितले. संबोधनादरम्यान पंतप्रधानांनी जी-२० चा उल्लेख करीत दिल्लीकरांची माफी मागितली, हे विशेष. (PM Modi)
जी-२० संमेलनामुळे ५ ते १५ सप्टेंबर पर्यंत दिल्लीकरांना असुविधेचा सामना करावा लागेल; यासाठी आताच क्षमा मागतो, अशा शब्दांत पंतप्रधानांनी माफी मागितली. जागतिक संमेलनामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे, अनेक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोकण्यात येणार आहे. परंतु, घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा घरातील मोठ्या सोफ्यावर आपण बसत नाही. पाहुण्यांना आपण सोफ्यावर बसण्याचा मान देतो. याचप्रमाणे जी-२० संमेलनासाठी भारतात येणारे प्रत्येक प्रतिनिधी आम्हा सर्वांचे पाहुणे आहे. त्यांच्या स्वागताने आपला गौरव वाढेल,

अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

राजधानी दिल्लीत ८ ते १० सप्टेंबर पर्यंत जी-२० संमेलनामुळे सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालये या काळात बंद राहतील. अनेक कार्यालयांनी घरून काम करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले आहेत.अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. अशात सर्वसामान्य दिल्लीकरांना असुविधेचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे पंतप्रधानांनी पूर्वीच दिलगिरी व्यक्त केली.

PM Modi : विचाराअंती त्या पॉईंट ला ‘शिवशक्ती’ नाव!

चांद्रयान बद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, यशस्वी अभियानानंतर एखाद्या पॉईंटला विशेष नाव देण्याची परंपरा आहे. सखोल विचाराअंती चांद्रयान ज्या ठिकाणी उतरले, त्या पॉईंटला ‘शिवशक्ती’ नाव द्यावे, असे ठरवले. शिवशक्ती चे नाव घेताच हिमालय, कन्याकुमारी आणि महिलाशक्तीचे  स्मरण होते, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.
हेही वाचा  
 

Back to top button