पुढारी ऑनलाईन : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने चांद्रयान-३ च्या रोव्हरचा एक व्हिडिओ जारी केला आहे. चांद्रयान-३ च्या लँडरमधून रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर कसे उतरले याचा हा व्हिडिओ आहे. यात रोव्हर लँडरवरून अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना दिसत आहे. (Chandrayaan-3 Rover)
इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील विश्वविक्रमी सॉफ्ट लँडिंगनंतर २ तास २६ मिनिटांनी विक्रम लँडरमधून बाहेर पडलेले 'प्रज्ञान' रोव्हर चंद्रावर उतरले. त्याने विशिष्ट परिघात चंद्राच्या पृष्ठभागावरील आपला स्वतंत्र प्रवास सुरू केला आहे. रोव्हर कामाला लागले असून, चंद्रावरील गूढ गोष्टींचा शोध त्याने सुरू केला आहे. चंद्रावर काही सेकंदआधी उतरण्यापूर्वीचा लँडरने व्हिडीओ घेतला. हा व्हिडीओ इस्रोने काल गुरुवारी सायंकाळी जारी केला होता.
प्रज्ञान वेगळे झालेले असले तरी विक्रमची नजर त्याच्यावर राहणार आहे. पुढील काळातही दोघे परस्परांच्या सान्निध्यातच राहतील. विक्रम लँडर बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरले होते. यानंतर २ तास २६ मिनिटांनी म्हणजेच बुधवारी रात्री ८.३० वाजता विक्रम लँडरच्या रॅम्पवरून प्रज्ञान रोव्हरही चंद्रावर उतरले होते. ते लँडरच्या रॅम्पवरून उतरतानाचा ३० सेकंदाचा व्हिडिओ इस्रोने शेअर केला आहे.
या महाविक्रमी यशानंतर, लँडरमधून रोव्हर बाहेर पडायला किती वेळ लागेल, हे आताच सांगता यायचे नाही. कदाचित त्यासाठी दिवसही जावा लागू शकतो, असे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते, पण लँडिंगनंतर प्रत्यक्षात मात्र त्यासाठी फार वेळ लागला नाही.
प्रज्ञान रोव्हर हा 6 चाकांचा एक रोबो असून, तो चंद्राच्या पृष्ठभागावर चालत राहणार आहे. चंद्रावरील मातीचे, मातीतील खनिजांचे, रासायनिक घटकांचे विश्लेषण करणार आहे. (Chandrayaan-3 Rover)
'विक्रम'पासून वेगळे झालेल्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावरून प्रवास सुरू केला आहे. रोव्हरच्या सहाय्याने 'इस्रो' या पृष्ठभागावरील महाकाय विवरांमध्ये गोठलेल्या बर्फाचे स्कॅनिंग करेल. ही छायाचित्रे तो 'इस्रो'ला पाठवेल. पृष्ठभागावरील दगड, माती, विवरे यांचा अभ्यास रासायनिक घटकांच्या विश्लेषणाद्वारे केला जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील टेकड्यांचे अचूक स्कॅनिंग करण्याचा प्रयत्न रोव्हर करणार आहे. अशा परिसराची छायाचित्रे काढण्याचे काम रोव्हरने सुरू केले आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे एक चंद्र दिवसासाठी (१४ पृथ्वी दिवस) काम करणार आहे.
हे ही वाचा :