पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत हा साप-गारुड्यांचा देश आहे, अशी खिल्ली काही वर्षांपूर्वी ब्रिटिशांसह पाश्चात्य देश उडवत असत. याच देशातील शास्रज्ञांनी आज ( दि.२३ ऑगस्ट ) इतिहास घडवला आहे. चांद्रयान -३ने आपली मोहिम फत्ते केली आणि देशभरातील नागरिकांची मान अभिमानाने उंचावली आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुवाला गवसणी घालणार भारत जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ('इस्रो') ऐतिहासिक यश देशभर साजरा केले जात आहे. सुमारे ६० वर्षांपूर्वी बैलगाडीतून सुरु झालेला 'इस्रो'चा प्रवास आज मिशन चांद्रयान- ३ पर्यंत सुर्वण अक्षरात लिहिणार्या सारखाच आहे. तुमच्याकडे साधने किती आहेत, त्यापेक्षा तुमचा दृष्टीकोन तुम्हाला घडवतो, हे वाक्य ही संस्था घडविणारे शास्रज्ञ अक्षरश: जगले आहेत. (ISRO's space journey) जाणून घेवूया बैलगाडी ते मिशन चांद्रयान ३…'इस्रो'च्या अदभूत आणि अविश्वसनीय प्रवासाबद्दल …
२१ नोव्हेंबर १९६३ रोजी केरळमधील थुंबा येथून अमेरिकन बनावटीचे दोन-स्टेज साउंडिंग रॉकेट (पहिले रॉकेट) 'नायके-अपाचे' प्रक्षेपित केले. रॉकेटचे घटक आणि अंतराळ उपकरणे बैलगाड्या आणि सायकलद्वारे प्रक्षेपण स्थळी नेण्यात आली होती.
स्वातंत्रोत्तर कालखंडात १९६२ साली विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वात अवकाश संशोधनासाठी राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली. यातूनच १९६९ मध्ये INCOSPAR चे रूपांतर अधिकृतरित्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये झाले.
इस्रोने आपला पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' रशियाच्या प्रक्षेपण केंद्रावरून १९ एप्रिल १९७५ साली प्रक्षेपित केला. या कामगिरीने अवकाश संशोधन क्षेत्रात आपले नाव नोंदवले. 'आर्यभट्ट' हा ३६० किलो वजनाचा एक लहान उपग्रह होता. याच्या निर्मितीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला होता तर यासाठी तीन कोटी रुपये खर्च आला होता. विशेष म्हणजे ज्या रशियाच्या प्रक्षेपण केंद्रावरुन आपालाहिला उपग्रह अंतराळात सोडला. त्याच रशियाची चांद्रयान मोहिम नुकतीच अपयशी ठरली असताना भारताची चांद्रयान-३ मोहिम फत्ते करत जगाला थक्क केले आहे.
ISRO ने १८ जुलै १९८0 रोजी SLV-3 ची यशस्वी चाचणी केली आणि स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित करू शकणार्या देशांच्या यादीत भारताचा समावेश केला.
INSAT-1B चे प्रक्षेपण १९८३ या वर्षी झालं. यामुळे भारतात दूरसंचार, दूरदर्शन प्रसारण आणि हवामान अंदाजात क्रांती घडवून आणली.
१९८४ मध्ये भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा हे रशियन अंतराळयान सोयुझ यानातून अंतराळात गेले, आजपर्यंत अंतराळात गेलेले ते एकमेव भारतीय नागरिक आहेत. इस्रोने अद्ययावत धृवीय प्रक्षेपक यान (पी.एस.एल.व्ही) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक यान (जी.एस.एल.व्ही.) या प्रक्षेपक यानांची निर्मिती केली आहे. या प्रक्षेपक यानातून इस्रोने अनेक दळणवळण, दिशादर्शक आणि संरक्षण उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. धृवीय प्रक्षेपक यानाची (पी.एस.एल.व्ही.) निर्मिती १९९३ मध्ये रशियाच्या मदतीने करण्यात आली. पी.एस.एल.व्ही. चे आतापर्यंत ४८ उड्डाणे झाली आहेत.
२२ ऑक्टोबर २००८ रोजी इस्रोने चांद्रयान-1 पाठवले. याचे वजन १३८० किलो इतके होते. १४ नोव्हेंबर २००८ रोजी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले. अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला होता. इस्रोने चांद्रयान-1 मोहिम केवळ ४५० कोटी रुपयांत पूर्ण केली होती. चांद्रयान-1 ने चंद्राच्या पृष्ठभागाचे मॅपिंग, खनिज रचना अभ्यासणे, पाण्यातील बर्फ शोधणे आणि चंद्राच्या बाह्यमंडलावर प्रयोग करणे यासह त्याचे निरीक्षण आणि वैज्ञानिक तपास सुरू केला. मिशनने मौल्यवान डेटा प्रदान केला. इस्रोची २००८ मधील चांद्रयान-१ मोहिम यशस्वी ठरली. ते एक ऑर्बिटर मिशन होते. ऑर्बिटरने १० महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली.
सध्या इस्रोकडे असलेले सर्वात अद्ययावत आणि जास्त वजनाचे उपग्रह जास्तीत जास्त उंचीवर नेणारे 'भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक यान' उपलब्ध आहे. ५ टना पर्यंतचे उपग्रह अवकाशातील खालच्या भ्रमणकक्षेत हा प्रक्षेपक सहज सोडू शकतो. सुरवातीला रशियाकडून क्रायोजेनिक इंजिन विकत घेतले होते. यानंतर इस्रोने स्वतः क्रायोजेनिक इंजिन निर्मिती केली.
जी.एस.एल.व्ही.मार्क-१ हे २००४ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. या प्रक्षेपक यानाच्या निर्मितीची सुरवात २००१ मध्येच करण्यात आली होता. २०१० मध्ये करण्यात आलेला स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन वापराचा प्रयोग अयशस्वी ठरला. मात्र २०१४ मध्ये स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन वापरून इस्त्रोने केलेले पहिले प्रक्षेपण यशस्वी ठरले. हे तंत्रज्ञान प्राप्त करणारा भारत हा जगातला सहावा देश ठरला आहे. चांद्रयान-२ साठी याच प्रक्षेपकाच्या थर्ड जनरेशनच्या तिसर्या पिढीचा वापर करण्यात आला होता.
इस्रोचा प्रवास एकेकाळी थुंबापासून सुरू झाला होता. भारताचे पहिले रॉकेट २१ नोव्हेंबर १९६३ रोजी केरळमधील थुंबा येथून प्रक्षेपित करण्यात आले. पुढील ५० वर्षांमध्ये भारत हा अंतराळ संशोधनातील सर्वात मोठा देश होईल, अशी कल्पनाही त्यावेळी कोणत्याही देशाने केली नव्हती. १५ फेब्रुवारी २०१७ रोजी ISRO ने एकाच वेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करून जागतिक विक्रम केला. आज भारत अमेरिका, रशिया इत्यादी देशांचे उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करत आहे. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी भारताने एकाच वेळी २९ परदेशी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेबाहेर ठेवून आपली योग्यता सिद्ध केली आहे.
१६ नोव्हेंबर २०१३ रोजी भारताने अवकाश विज्ञानाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. या दिवशी 2:39 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून PSLV C-25 मार्स ऑर्बिटर (मंगलयान) च्या अंतराळ प्रवासाला सुरुवात झाली. २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळावर पोहोचल्यानंतर, पहिल्याच प्रयत्नात अशा मोहिमेत यशस्वी होणारा भारत हा पहिला देश ठरला. यासह, सोव्हिएत रशिया, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीनंतर अशी मोहीम पाठवणारा हा जगातील चौथा देश ठरला होता. तसेच मंगळवावर सर्वात कमी खर्चात यान पाठविणारा हा भारत जगातील एकमेव देश आहे.
इस्रोने चांद्रयान २ मोहीम २२ जुलै २०१९ रोजी प्रारंभ झाला. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाशकेंद्रातून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान मार्क ३ (GSLV MK III -M1) द्वारे प्रक्षेपित केले होते. या यानात कक्षाभ्रमर (Orbiter), लॅंडर ( Lander) व रोव्हर (Rover) यांचा समावेश होता. या मोहिमेत इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरून विक्रम लँडर नाव ठेवण्यात आले होते. ७ सप्टेंबर रोजी दक्षिण ध्रुवीय प्रदेशात हा लँडर उतरण्याची योजना होती. मात्र विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याच्या आधी २ किमी उंचीवर संपर्क तुटला होता; परंतु चांद्रयान-2 चे ऑर्बिटर अजूनही कार्यरत आहे. भारताची दुसरी चांद्रयान मोहित अपयशी ठरली होती. मात्र या अपयशाने इस्रोने पुन्हा नव्या उमेदीने चांद्रयान-३ मोहिम हाती घेतली. ही मोहिम फत्ते करत भारताने पुन्हा एकदा अंतराळातील एक मोठी शक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
हेही वाचा