E-passport : दोन महिन्यांत मिळणार चिप बसवलेले ई-पासपोर्ट | पुढारी

E-passport : दोन महिन्यांत मिळणार चिप बसवलेले ई-पासपोर्ट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चिप बसवलेले खास पासपोर्ट देशभरात येत्या दोन महिन्यांत उपलब्ध केले जाणार असून त्यामध्ये 41 प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश असणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या मानकांचे पालन करणार्‍या 140 देशांमधील विमानतळांवर इमिग्रेशन प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण केली जाईल. परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली.

नव्याने दिले जाणारे पासपोर्ट नेहमीच्या पासपोर्ट पुस्तिकेसारखेच असतील. तथापि त्याच्या मध्यभागी केवळ एका पानावर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चिप आणि शेवटी एक लहान फोल्डेबल अँटेना बसविलेला असेल.

चिपमध्ये बायोमेट्रिक तपशील आणि आधीपासून रेखांकित केलेल्या सर्व गोष्टी असतील. पासपोर्ट सेवा कार्यक्रम 2.0 (पीएसपी) असे या योजनेचे नाव आहे.

चिप बसवलेल्या पासपोर्टसाठी केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून ही योजना टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून त्यासाठी पासपोर्ट केंद्रांना तांत्रिकद़ृष्ट्या अपग्रेड केले जात आहे.

देशातील सामान्य नागरिकांना येत्या दोन महिन्यांत पहिला ई-पासपोर्ट मिळू शकेल. या चिप-सक्षम पासपोर्टच्या सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. नाशिकमधील इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये पहिल्या वर्षी 70 लाख ई-पासपोर्ट कोर्‍या पुस्तिकांचे मुद्रण सुरू होणार असून या प्रेसला 4.5 कोटी चिप पासपोर्ट छापण्याची ऑर्डर मिळाली आहे.

तोतयागिरीला बसणार चाप

ई-पासपोर्टसाठी विमानतळावर आधुनिक बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यात पासपोर्टमधील चेहर्‍याची प्रतिमा आणि इमिग्रेशन दरम्यानची थेट प्रतिमा काही सेकंदांत जुळवली जाईल. कोणी तोतयागिरी करून आला असेल, तर यंत्रणा त्याला तत्काळ पकडेल. सध्या पुस्तिकेतील पासपोर्टमधील जुना फोटो आणि थेट प्रतिमा अनेकदा जुळत नाही. नव्या पासपोर्ट प्रणालीमुळे ही अडचण दूर होईल. चिप पासपोर्टसाठी जुनी पासपोर्ट पुस्तिका सादर केल्यानंतर तिच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची छायाप्रत घेतली जाणार आहे.

पासपोर्ट सेवा कार्यक्रम 2.0 सुरू झाल्यानंतर तयार केले जाणारे सर्व पासपोर्ट चिपचे असतील. जुनी पुस्तिका रिकामी असली तरीही तुम्ही नियुक्त केंद्रावर जुना पासपोर्ट जमा करून नव्यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुम्हाला ई-पासपोर्ट मिळेल.

एकसमान पासपोर्ट हा मूळ हेतू

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेचे सध्या 193 सदस्य देश आहेत. या संस्थेने सदस्य देशांमध्ये एकसमान ई-पासपोर्ट लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय उत्कृष्टतेचे डिजिटल पासपोर्ट इमिग्रेशनसाठी नवे मानक बनणार आहेत. भारताचाही त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे भारतालाही या ई-पासपोर्ट प्रणालीचा मोठा फायदा होणार आहे.

Back to top button