Supreme Court : दाभोळकर, लंकेश, कलबुर्गी हत्येत समान धागा आहे का? सुप्रीम कोर्टाची CBIला विचारणा | पुढारी

Supreme Court : दाभोळकर, लंकेश, कलबुर्गी हत्येत समान धागा आहे का? सुप्रीम कोर्टाची CBIला विचारणा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंधश्रद्धा निर्मलनासाठी काम करणारे डॉ. नरेंद्र दाभोळकर, सीपीआय नेते गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि अभ्यासक डॉ. एमएम कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये काही ‘समान धागा’ आहे का? अशी विचारणा शुक्रवारी सीबीआयला केली.

दाभोलकरांची कन्या मुक्ता दाभोलकर यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) हा प्रश्न विचारला. मुक्ता यांनी आपल्या वडिलांच्या हत्येच्या तपासासंदर्भात १८ एप्रिल २०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे.

या चार हत्यांमागे मोठा कट होता.उपलब्ध पुराव्यांवरून असे सूचित होते की ही प्रकरणे जोडली जाऊ शकतात आणि मुक्ता दाभोलकर यांनी हा मुद्दा उच्च न्यायालयासमोर मांडला होता, असा युक्तिवाद मुक्ता यांची बाजू मांडणारे वकील आनंद ग्रोव्हर यांनी केला.

उच्च न्यायालयाने दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे आणि काही साक्षीदार तपासण्यात आले आहेत, असे खंडपीठाने सांगताच अद्याप दोन आरोपी फरार असल्याचे ग्रोव्हर यांनी लक्षात आणून दिले. आतापर्यंत २० साक्षीदार तपासण्यात आले आहेत. खंडपीठाने एएसजी भाटी यांना सांगितले की, याचिकाकर्त्याने कटात आणखी लोक सामील असल्याचा आरोपही केला आहे. खंडपीठाने नमूद केले.

दाभोळकर, पानसरे आणि लंकेश यांच्या हत्येमध्ये सामाईक संबंध असल्याचा सीबीआयला संशय असल्याचे ग्रोव्हर यांनी १८ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. तिन्ही हत्यांमध्ये वापरलेले शस्त्रे एकच होती आणि गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती एकच असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे सीबीआयला अधिक तपास करायचा होता, असे ग्रोव्हर म्हणाले.

Back to top button