Chandrayaan-3 Mission | चांद्रयान-३ चंद्राच्या जवळ, इस्रोने दिली मोठी अपडेट

Chandrayaan-3 Mission
Chandrayaan-3 Mission

पुढारी ऑनलाईन : चांद्रयान-३ मोहिमेसंदर्भात भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने महत्वाची अपडेट दिली आहे. "चांद्रयान-३ ची कक्षा आज (दि.१६) बदलण्यात आली. आता चांद्रयान-३ ला १५३ किमी x १६३ किमीच्या कक्षेत ठेवण्यात यश आले. आता प्रोपल्शन मॉड्युल आणि लँडर मॉड्युल त्यांच्या स्वतंत्र प्रवासासाठी वेगळे होण्याच्या तयारीची वेळ आली आहे. १७ ऑगस्ट २०२३ रोजी लँडर मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करण्याचे नियोजित आहे." असे इस्रोने ट्विट करत म्हटले आहे. (Chandrayaan-3 Mission)

चांद्रयान-३ ने चंद्राच्‍या शेवटच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. इस्रोने चांद्रयान-३ ला १५३ किमी x १६३ किमी कक्षेत ठेवण्याची युक्ती बुधवारी पहाटे यशस्वीरित्या पूर्ण केली, ज्यात विक्रम (लँडर) आणि प्रज्ञान (रोव्हर) यांचा समावेश असलेल्या लँडिंग मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे.

चांद्रयान -३ ला बुधवार, २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा इस्रोचा प्रयत्न आहे. यासाठी सात दिवस बाकी आहेत. बुधवारी अखेरच्या कक्षेत नेण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर इस्रो गुरुवारी लँडर वेगळे करण्यासाठी आणखी एक युक्ती करेल. त्यानंतर विक्रमला (लँडर) पुन्हा लंबवर्तुळाकार कक्षेत ठेवावे लागेल. हे साध्य करण्यासाठी ISRO लँडिंग मॉड्यूलमध्ये ठेवण्यासाठी पुन्हा युक्ती करेल.

डी-बूस्ट मॅन्युव्हर्स अखेरीस विक्रम लँडरला एका कक्षेत ठेवतील जिथे पेरील्यून (चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू) ३० किमीवर आहे आणि अपोलून (चंद्रापासून सर्वात दूरचा बिंदू) १०० किमी आहे. या कक्षेतून अंतिम लँडिंगचा प्रयत्न केला जाणार आहे. ३० किमी x १०० किमी परिभ्रमण पूर्ण झाले की, लँडिंगचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे लँडरचा वेग ३० किमी उंचीवरून अंतिम लँडिंगपर्यंत कमी करण्याची प्रक्रिया सुरु होईल, असे इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी याआधी सांगितले होते.

चांद्रयान-३ चे १४ जुलै रोजी प्रक्षेपण करण्यात आले होते. बुधवारी (दि.१६) चांद्रयान-३ च्‍या अंतराळ प्रवासाला ३३ दिवस पूर्ण झाले आहेत. आता चांद्रयान-३ ला चंद्राच्या पृष्ठाभागावर उतरण्याचे वेध लागले आहेत. (Chandrayaan-3 Mission)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news