हिमाचल, उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; मृतांचा आकडा ६६ वर, शिमला, जोशीमठ येथे घरे कोसळली | पुढारी

हिमाचल, उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; मृतांचा आकडा ६६ वर, शिमला, जोशीमठ येथे घरे कोसळली

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने अक्षरश: कहर केला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. शिमल्याच्या समर हिल भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. अनेक ठिकाणी घरे कोसळली असून बचाव कार्य सुरू आहे.

पावसामुळे सर्वाधिक मृत्यू हिमाचल प्रदेशात झाले आहेत, १३ ऑगस्टपासून आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला आहे, असे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सांगितले. दरम्यान, आणखी दोन दिवस हिमाचल प्रदेशात आणि पुढील चार दिवस उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हिमाचलमध्ये मृतांचा आकडा ६० वर

मंगळवारी बचाव कर्मचार्‍यांनी भूस्खलनामुळे ढिगाऱ्यातून तीन मृतदेह बाहेर काढले. शिमल्यातील एका कोसळलेल्या शिवमंदिराच्या ढिगाऱ्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला, तर शहरातील भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू झाला. शिमल्यातील कृष्णनगर परिसरात भूस्खलनामुळे आठ घरे कोसळली आणि एक कत्तलखाना ढिगाऱ्याखाली गाडला गेला. सोमवारपासून एकूण १९ मृतदेह सापडले आहेत. समर हिल येथील शिवमंदिराच्या ठिकाणी १२, फागली येथे पाच आणि कृष्णानगर येथे दोन मृतदेह सापडले आहेत. सोमवारी कोसळलेल्या शिवमंदिरात १० हून अधिक लोक अजूनही अडकल्याची भीती आहे.

खराब हवामानामुळे बुधवारी राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील, असे शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) आणि लष्कराने पोलिस आणि SDRF सोबत सकाळी ६ च्या सुमारास समर हिल येथे पुन्हा बचाव कार्य सुरू केले, असे शिमलाचे उपायुक्त आदित्य नेगी यांनी सांगितले. दरम्यान, हवामान खात्याने पुढील चार दिवस १९ ऑगस्टपर्यंत यलो अलर्ट दिला आहे.

Back to top button