हरियाणातील नूहमध्ये तब्बल १३ दिवसांनी इंटरनेट सेवा पूर्ववत | पुढारी

हरियाणातील नूहमध्ये तब्बल १३ दिवसांनी इंटरनेट सेवा पूर्ववत

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणातील नूह येथील हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. तब्बल 13 दिवसांनंतर प्रशासनाने जिल्ह्यातील विविध भागात बंद इंटरनेट सेवा सुरू केली. प्रशासनाकडून सोशल मीडियावर सतत नजर ठेवली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ३१ जुलै रोजी नूहमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाल्यानंतर शाळा आणि महाविद्यालयेही बंद करण्यात आली होती. जी नंतर परिस्थिती सुधारल्यानंतर सुरू करण्यात आली.

३१ जुलै रोजी नूह येथे झालेल्या जातीय हिंसाचारानंतर रविवारी नूह-पलवल सीमेवरील पलवल जिल्ह्यातील पोंडरी गावात सर्व हिंदू समाजाची महापंचायत झाली. त्यात द्वेषपूर्ण भाषण दिले जाणार नाही, या अटीवर पंचायत ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र महापंचायती दरम्यान पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत काही जणांनी धमक्या दिल्या. पंचायतीतील एक वक्ता म्हणाला की, “तुम्ही बोट दाखवले तर आम्ही तुमचे हात कापून टाकू.”

महापंचायतीच्या आयोजकांचा दावा आहे की वक्त्यांना द्वेषपूर्ण भाषणे करू नका, असा इशारा देण्यात आला होता, परंतु काही लोकांनी ते ऐकले नाही. हिंसाचार पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि २८ ऑगस्टपासून पुन्हा जलाभिषेक यात्रा सुरू करण्यासाठी महापंचायतमध्ये चर्चा झाली होती. महापंचायतीच्या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते.

हेही वाचा : 

Back to top button