No-confidence Motion : ‘मोदी 100 वेळा पंतप्रधान बनले तरी आम्हाला काही अडचण नाही’ | पुढारी

No-confidence Motion : ‘मोदी 100 वेळा पंतप्रधान बनले तरी आम्हाला काही अडचण नाही’

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी गुरुवारी अविश्वास ठरावावर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, तुमच्याकडे बहुमत आहे, तुम्ही जिंकू शकता. अविश्वास प्रस्ताव आणण्याचा आम्ही यापूर्वी विचार केला नव्हता. पण मणिपूरवरील चर्चेत पंतप्रधान मोदींनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा होती. त्यामुळे हा प्रस्ताव आम्हाला आणावा लागला. या ठरावाची ताकद म्हणजे पंतप्रधान मोदींना सभागृहात येण्यास भाग पडले आहे. आम्हाला फक्त पंतप्रधान मोदींशी मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अधीर रंजन पुढे म्हणाले की, ‘देशाचे प्रमुख असल्याने पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या लोकांसमोर आपले विचार मांडायला हवे होते. ही मागणी चुकीची मागणी नव्हती. ही सर्वसामान्यांची मागणी होती. मोदी 100 वेळा देशाचे पंतप्रधान झाले तरी आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला देशातील जनतेशी देणं-घेणं आहे.’

मणिपूरच्या घटनेचा संदर्भ देत चौधरी यांनी पीएम मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, जिथे राजा आंधळा असतो, तिथे द्रौपदीचे वस्त्रहरण होत असते. यावर वक्तव्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेप घेतला. ते आक्रमक झाले आणि चौधरींनी धारेवर धरत ‘तुम्ही पंतप्रधानांबद्दल अशा प्रकारे सभागृहात बोलू शकत नाही,’ असे खडेबोल सुनावले.

यानंतर चौधरींनी सारवासारव केली. त्यांनी स्पष्टीकरण दिले की, ‘मला असं म्हणायचं आहे की पंतप्रधान मोदी प्रत्येक गोष्टीत काहीतरी बोलतात. पण मणिपूरबाबत ते गप्प आहेत. आम्हाला ते अजिबात आवडलेले नाही. मणिपूरमधून दोन खासदार आहेत. त्यांना बोलण्याची संधी देता येत नाही. आम्ही अमित शहा यांना विचारू इच्छितो की त्यांनी केलेले विधान हे जीवघेणे होते. तुम्ही बफर झोनमध्ये सुरक्षा दल तैनात केल्याचे सांगितले. नियंत्रण रेषेत बफर झोन तयार होतात. आपण स्वीकारत आहात याचा अर्थ काय आहे. बफर झोन हे लाईन ऑफ कंट्रोलमध्ये तयार केले जातात. तुम्ही स्वीकारत आहात याचा अर्थ काय आहे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नीरव मोदी परदेशात फिरत राहतो, त्याचे फोटो येत राहतात, आम्हाला वाटले की नीरव मोदी परदेशात गेला आहे. आणि त्यानंतर पीएम नरेंद्र मोदींमध्ये नीरव मोदी दिसतोय, असा टोलाही चौधरींनी यावेळी लगावला.

Back to top button