महाराष्ट्रात सर्वात पहिले सरकार शरद पवार यांनीच पाडले; अमित शहांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार | पुढारी

महाराष्ट्रात सर्वात पहिले सरकार शरद पवार यांनीच पाडले; अमित शहांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपने पाडल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मंगळवारी केला होता. त्याला प्रत्युत्तर देत महाराष्ट्रात सर्वात पहिले सरकार जर कोणी पाडले असेल, तर ते शरद पवार यांनी… असा जोरदार पलटवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत केला.

अविश्वास प्रस्तावावर बुधवारी लोकसभेत जोरदार वादळी चर्चा झाली. यावेळी गृहमंत्री शहा यांनी राहुल गांधींसह विरोधकांच्या आरोपांना उत्तरेही दिली. राष्ट्रवादीच्या खा. सुळे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना शहा यांनी शरद पवार यांचे नाव घेताच दोघांमध्ये शाब्दिक चकमकही उडाल्याचे पाहायला मिळाले. सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करताना भाजपने गेल्या 9 वर्षांत 9 सरकारे पाडली, असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना शहा म्हणाले, सुप्रियाजी, वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून भारतीय जनसंघाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करून शरद पवार मुख्यमंत्री झाले होते.

शहा यांनी पवार यांचा उल्लेख करताच खा. सुळे यांनी शहा यांना भाषणादरम्यान रोखत त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच्या सरकारचे समन्वयक एस. एम. जोशी होते, असे त्यांना सांगताच शहा संतापले आणि म्हणाले, जोशी समन्वयक होते हे खरे असले तरी तेव्हा मुख्यमंत्री कोण झाले? सत्ता कोणी भोगली? सत्तेचे सुख कोणी प्राप्त केले? असे प्रतिप्रश्न करीत शहा यांनी सुळे यांच्या वर्मावरच घाव घातला.

Back to top button