Stock Market Closing Bell | सेन्सेक्स २३२ अंकांनी वाढून बंद, जाणून घ्या Zomato, Paytm शेअर्स का वधारले? | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स २३२ अंकांनी वाढून बंद, जाणून घ्या Zomato, Paytm शेअर्स का वधारले?

पुढारी ऑनलाईन : जागतिक संमिश्र संकेतांदरम्यान आज सोमवारी (दि.७) भारतीय शेअर बाजाराने तेजी राहिली. सेन्सेक्स आज २३२ अंकांनी वाढून ६५,९५३ वर बंद झाला. तर निफ्टी ८० अंकांच्या वाढीसह १९, ५९७ वर स्थिरावला. क्षेत्रीय निर्देशांकात हेल्थकेअर आणि आयटी १ टक्क्यांपर्यंत वाढले. रियल्टी ०.५ टक्के वाढला. तर पीएसयू बँक निर्देशांक ०.६ टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅप ०.५ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.२५ टक्के वाढला. फार्मा आणि आयटी स्टॉक्समध्ये आज खरेदी दिसून आली. (Stock Market Closing Bell)

‘हा’ शेअर ४ टक्क्यांनी वाढला

सेन्सेक्स आज ६५,८११ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६६ हजारांपर्यंत पोहोचला. सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर ४ टक्के वाढून १,५२८ रुपयांवर पोहोचला. सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस हे शेअर्स १ टक्क्यांहून अधिक वाढले. टेक महिंद्रा, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो हे शेअर्सही वाढले. दरम्यान, एसबीआय, टाटा मोटर्स, कोटक बँक, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले.

अमेरिका आणि चीनमधील महागाईची आकडेवारी आणि आरबीआयच्या पतधोरण निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांची भूमिका सुरुवातीला काहीशी भूमिका दिसून आली. यामुळे सुरुवातीला सेन्सेक्स, निफ्टीने किरकोळ वाढ नोंदवली. त्यानंतर सेन्सेक्स २०० अंकांच्या वाढीसह व्यवहार केला.

Paytm चा शेअर्स ११ टक्क्यांनी वाढला

फिनटेक फर्म One97 कम्युनिकेशन्सचा शेअर आज सुमारे ११ टक्क्यांनी वाढून ८८७ रुपयांवर पोहोचला. कंपनीचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी अँटफिन (नेदरलँड) होल्डिंग बी. व्ही. शी पेटीएममधील १०.३० टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा करार केल्यानंतर One97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स वधारले. (Stock Market Updates) शर्मा हे वन 97 कम्युनिकेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. (Paytm shares)

झोमॅटोची कमाल, शेअर शंभरी पार

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचा (Shares of food delivery platform Zomato) चा शेअर आज ८ टक्क्यांनी वाढून १०० रुपये पार झाला. या शेअरने आज १०२.८ रुपयांवर व्यवहार करत ५२ आठवड्यांचा नवा उच्चांकही गाठला. दुपारी १२.४५ वाजता हा शेअर ५ टक्क्यांच्या वाढीसह १०० रुपयांवर होता. पहिल्या तिमाहीत (Q1 FY24) झोमॅटोने फायदा नोंदवला. यामुळे झोमॅटोच्या शेअर्समध्ये वाढ झाली. Zomato ने जून २०२३ ला संपलेल्या तिमाहीत २ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत या फर्मला १८६ कोटींचा तोटा झाला होता. तर मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला १८९ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

आशियाई बाजारात घसरण

आशिया-पॅसिफिक बाजारात आज घसरण दिसून आली. या आठवड्याच्या अखेरीस चीनमधील महागाई दराचे आकडे जाहीर होणार आहे. त्यापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक किरकोळ वाढला. चीनचा शांघाय कंपोझिट ०.५९ टक्के घसरून ३,२६८ वर आला. तर शेंनझेन कंपोनंट ०.८३ टक्के घसरून ११,१४५ वर बंद झाला. जपानचा निक्केई ०.१९ टक्के घसरून ३२,२५४ वर बंद झाला. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.८५ टक्क्यांनी खाली आला आहे. हा निर्देशांक सलग चौथ्या दिवशी घसरल्याने नुकसान झाले आहे.

हे ही वाचा : वेळेत प्राप्तिकर विवरण भरले नसल्यास काय करावे? 

Back to top button