अयोध्येतील राम मंदिरासाठी ४०० किलोच्या भव्य कुलूपाची निर्मिती | पुढारी

अयोध्येतील राम मंदिरासाठी ४०० किलोच्या भव्य कुलूपाची निर्मिती

अलिगड; पीटीआय : अयोध्येत साकारत असलेल्या राम मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये भाविकांसाठी मंदिर खुले होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अलिगड येथील रामभक्त आणि प्रसिद्ध कुलूप निर्माते सत्यप्रकाश शर्मा यांनी सर्वात मोठे हस्तनिर्मित कुलूप या मंदिरासाठी तयार केले आहे. त्याचे वजन 400 किलो आहे. कुलूप बनवण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केली आहे. हे भव्य कुलूप या वर्षाच्या अखेरीस राम मंदिराच्या अधिकार्‍यांकडे सोपवण्यात येणार आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिरासाठी मोठ्या संख्येने भक्तांकडून भेटस्वरूपात अनेक वस्तू दिल्या जात आहेत. शर्मा यांनी तयार केलेल्या कुलपाचा उपयोग कुठे करता येईल, हे नंतर सर्वानुमते ठरवण्यात येणार आहे.
शर्मा यांचे कुटुंबीय एक दशकाहून अधिक काळापासून हस्तनिर्मित कुलूप बनवत आहेत. ते स्वतः 45 वर्षांपासून या व्यवसायात आहेत. एरवीदेखील अलिगडला ‘कुलपांची नगरी’ असे म्हटले जाते.

शर्मा यांनी सांगितले की, राम मंदिराची भव्यता लक्षात घेऊन चार फुटांची चावी असलेले भव्य-दिव्य कुलूप आम्ही बनवले आहे. ते 10 फूट उंच व 4.5 फूट लांब असून त्याची जाडी आहे 9.5 इंच. जेव्हा मंदिराचे काम अंतिम टप्प्यात येऊ लागले, तेव्हाच आम्ही मंदिराला शोभेल असे महाकाय कुलूप तयार करण्याचे ठरविले होते. अखेर आमचे स्वप्न साकार झाले आहे. शर्मा यांच्या पत्नी रुक्मिणी म्हणाल्या की, याआधी आम्ही 6 फूट लांब आणि 3 फूट रुंद कुलूप बनवले होते. तथापि, काही लोकांनी आम्हाला त्याहून मोठे कुलूप बनवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आम्ही त्यावर काम सुरू केले.

कुलपासाठी दोन लाखांचा खर्च

सत्यप्रकाश यांनी सांगितले की, हे कुलूप तयार करण्यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च आला. त्यासाठी मी स्वेच्छेने पैसे साठवले. अनेक दशकांपासून कुलूप बनवण्याचा व्यवसाय करत असल्याने राममंदिरासाठी मोठे कुलूप तयार करण्याचा विचार केला. आमचे शहर कुलपांसाठी ओळखले जाते. विशेष म्हणजे एवढे भव्य कुलूप यापूर्वी कोणीही तयार केले नव्हते.

Back to top button