अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा २१ जानेवारीपासून

Ayodhya Ram temple
Ayodhya Ram temple

अयोध्या; पीटीआय : अयोध्येतील राम मंदिरामध्ये 21 जानेवारीपासून मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा सुरू होणार आहे. हा धार्मिक विधी 23 जानेवारीपर्यंत सलग तीन दिवस राहणार आहे. मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम जन्मभूमीतील या सोहळ्यासाठी अधिकृत निमंत्रण देण्यात येणार आहे. साधू-संतासह महनीय व्यक्तींना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली.

ते म्हणाले की, मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा बिगरराजकीय असणार आहे. सोहळ्याच्या ठिकाणी व्यासपीठ असणार नाही. कोणत्याही प्रकारची जनसभा घेण्यात येणार नाही. विविध राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात येणार आहे. ज्या राजकीय पक्षांना या सोहळ्यास यायची इच्छा असेल, ते येऊ शकतात. कोव्हिड-19 मुळे 5 ऑगस्ट 2020 रोजी रामजन्मभूमीवर भूमिपूजन सोहळा मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 136 सनातन परंपरेतील 25 हजार हिंदू साधू-संतांशिवाय 10 हजार खास पाहुण्यांना निमंत्रित केले जाणार आहे. रामलल्लाच्या गर्भगृहाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहितीही राय यांनी दिली.

भाविकांसाठी महिनाभर मोफत अन्नछत्र

या सोहळ्यानिमित्त देशभरातील भाविक अयोध्येला भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात एक महिन्यासाठी भाविकांसाठी मोफत अन्नछत्राची सुविधा करण्यात येणार आहे. दररोज एक लाख भाविकांना भोजन देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news