अडथळ्यांशिवायची टोल प्रणाली लवकरच अंमलात येणार; केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांची माहिती | पुढारी

अडथळ्यांशिवायची टोल प्रणाली लवकरच अंमलात येणार; केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांची माहिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा; कोणत्याही अडथळ्यांशिवायची टोल प्रणाली लवकरच अंमलात आणली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. अडथळ्यांशिवायच्या टोल प्रणालीमुळे वाहनधारकांना टोल नाक्यावर अर्धा मिनिटही थांबावे लागणार नाही, असे सिंग म्हणाले.

अडथळ्यांशिवायच्या टोल प्रणालीची प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरु आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर देशभरातील टोल नाक्यांवर ही प्रणाली बसविण्यात येईल, असे सांगून सिंग पुढे म्हणाले की, नवीन टोल प्रणालीमुळे वाहनधारकांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे. याशिवाय टोल नाक्यांवर रांगा लागण्याचे प्रमाण देखील कमी होईल. फास्ट टॅगची अंमलबजावणी करण्यात आल्याने लोकांचा प्रतीक्षा कालावधी 47 सेकंदापर्यंत कमी झाला आहे. पण अडथळ्यांशिवाय टोल प्रणालीमुळे हा वेळ 30 सेकंदापर्यंत खाली येईल.

सध्या दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे वर नव्या प्रणालीची चाचणी सुरु आहे. प्रणालीसाठी सॅटेलाईट तसेच कॅमेरा आधारित तंत्राचा अवलंब केला जात आहे. टोल प्लाझावरील डेटा व्यवस्थापनासाठी दूरसंचार क्षेत्राची मोठी मदत होत आहे, असे सिंग यांनी नमूद केले. दरम्यान वाहनधारकाने कापलेल्या अंतराच्या आधारावर त्याच्याकडून टोल वसूल करण्याच्या पद्धतीचा अवलंबही आगामी काळात केला जाणार असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा :

…. ‘तो’पर्यंत सभागृहात येणार नाही : लोकसभा अध्‍यक्षांचा निर्णय, जाणून घ्‍या कारण

Stock Market Crash | ब्लडबाथ! सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांच्या ३.५६ लाख कोटींचा चुराडा

Back to top button