कर्नाटकात सोशल मीडियावर येणार निर्बंध | पुढारी

कर्नाटकात सोशल मीडियावर येणार निर्बंध

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : समाज माध्यमांवर वादग्रस्त आणि सामाजिक एकता भंग करणार्‍या पोस्ट रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यातून समाजविघातक प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

सध्या समाजमाध्यमांवर अनेक चुकीचे संदेश व्हायरल करण्यात येत आहेत. सरकारच्या विरोधात खोटे आरोप करण्याबाबत काही व्यक्तींना लक्ष्य करुन ट्रोल करण्यात येते. यातून अनेकांचा अवमान केला जातो, हे प्रकार रोखण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गांभीर्याने प्रयत्न चालविले आहेत, अशी माहिती गृहमंत्री परमेश्वर यांनी दिली.

ते पत्रकारांबरोबर बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री, मंत्री, सरकारच्या विरोधात निराधार बातम्या, आरोप समाजमाध्यमांवर करण्यात येतात. विदेशातून आरोप केले जातात. याबाबत संबंधित संस्थांकडे तक्रार केल्यास योग्य उत्तर मिळत नाही. परिणामी फेक बातम्यांना आळा घालण्यासाठी गंभीरपणे विचार करण्यात येत आहे. सायबर गुन्ह्यांबाबत राष्ट्रीय पातळीवर कायदा आहे. राज्यस्तरावर कायदा नाही. यामुळे राज्यात स्वतंत्र कायदा लागू करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सायबर गुन्हे रोखण्यासाठी गृह खाते आणि आयटी खाते यांच्या नेतृत्वाखाली समितीची नेमणूक केली आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञानासंबंधित कायदा तज्ज्ञांचा समावेश केला आहे.

Back to top button