Chandrayaan-3 : ‘चांद्रयान-३ ’ चंद्राच्या कक्षेत ५ ऑगस्टला पोहोचणार | पुढारी

Chandrayaan-3 : ‘चांद्रयान-३ ’ चंद्राच्या कक्षेत ५ ऑगस्टला पोहोचणार

श्रीहरिकोटा; वृत्तसंस्था : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रोच्या) शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने पाठवलेल्या ‘चांद्रयान-3’चा (Chandrayaan-3) प्रवास व्यवस्थित सुरू असून, आता 5 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या कक्षेत पोहोचेल आणि 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. यापूर्वी, ‘चांद्रयान-3’ लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते.

ट्रान्सलुनर इंजेक्शन या प्रक्रियेसासाठी, ‘इस्रो’च्या बंगळूर येथील मुख्यालयातील शास्त्रज्ञांनी काही काळ ‘चांद्रयान-3’चे इंजिन सुरू केले. ‘चांद्रयान-3’ पृथ्वीपासून 236 कि.मी. अंतरावर असताना इंजिन फायरिंग करण्यात आले. ‘इस्रो’ने म्हटले आहे की, ‘चांद्रयान-3’ पृथ्वीभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण करून चंद्राकडे सरकत असून, ते ट्रान्सलुनर कक्षेत ठेवण्यात आले आहे.

चौदा दिवस चालणार प्रयोग (Chandrayaan-3)

‘चांद्रयान-3’मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युल आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि तेथे 14 दिवस प्रयोग करतील. प्रोपल्शन मॉड्युल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणार्‍या किरणोत्सर्गाचा अभ्यास करणार आहे. या मोहिमेद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात, यामागचे रहस्य ‘इस्रो’ शोधून काढणार आहे. तसेच चंद्रावरील मातीचाही अभ्यास केला जणार आहे.

‘चांद्रयान-3’चा आतापर्यंतचा प्रवास

– 14 जुलै रोजी, ‘चांद्रयान-3’ 170 कि.मी. x 36,500 कि.मी.च्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले.
– 15 जुलै रोजी, प्रथमच कक्षा 41,762 कि.मी. x 173 कि.मी. इतकी वाढवण्यात आली.
– 17 जुलै रोजी, कक्षा दुसर्‍यांदा 41,603 कि.मी. x 226 कि.मी. इतकी वाढवण्यात आली.
– 18 जुलै रोजी, कक्षा तिसर्‍यांदा 51,400 कि.मी. x 228 कि.मी.पर्यंत वाढविण्यात आली.
– 20 जुलै रोजी, कक्षा चौथ्यांदा 71,351 x 233 कि.मी.पर्यंत वाढवण्यात आली.
– 25 जुलै रोजी, कक्षा पाचव्यांदा 1,27,603 कि.मी. x 236 कि.मी.पर्यंत वाढविण्यात आली.
– 31 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान मध्यरात्री चंद्राने पृथ्वीची कक्षा सोडली.

Back to top button